थिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

शिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बैठक ठरल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

शिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बैठक ठरल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

थिटेवाडी धरणात कळमोडी व डिंभ्याचे पाणी येत नाही तोपर्यंत विधानसभा-लोकसभा निवडणुकीवर ग्रामसभा घेऊन बहिष्कार टाकलेल्या केंदूरकरांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पालकमंत्री गिरीश बापट व ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन मंत्री स्तरावर पाठपुराव्याचा निर्धार केला. केंदूर ग्रामसभेचा ठराव आढळराव यांच्याकडे सुपूर्द करीत पहिली बैठक आढळराव यांच्याच निवासस्थानी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे झाली. या वेळी आढळराव यांनी सांगितले, की ‘‘कळमोडीच्या पाणीवाटपाबाबत दोन वर्षांपूर्वी वरील दोन्ही मंत्र्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. त्यानुसार थिटेवाडीत पाणी येणे शक्‍य आहे. निधीची तरतूदही सरकार करण्यास तयार आहे. मात्र केंदूरकरांची आणि मंत्र्यांची बैठक घडवून आणली तरच हा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने पुढील आढवड्यात वरील दोन्ही मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यात पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याबाबत आपण पुढे असणार आहोत.’’ 

दरम्यान, आम्ही आता वळसे पाटील आणि गिरीश बापट यांच्याकडेही लगेच जाऊन येणार असून, आमच्यासाठी मंत्र्यांच्या बैठका आणि थिटेवाडीचा प्रश्न सुटणे एवढेच महत्त्वाचे असून, हा प्रश्न न सुटल्यास मतदान बहिष्कार अटळ असल्याची माहिती माजी सरपंच तुकाराम थिटे, भरत साकोरे, सूर्यकांत थिटे, युवराज साकोरे, भाऊसाहेब थिटे व गोविंद साकोरे यांनी दिली. या वेळी बी. एस. थिटे, अशोक पऱ्हाड, जयदीप ताठे, शिवाजी डुकरे, महेश 
गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘वळसे पाटील यांनी बैठकीला यावे’  
दोन्ही मत्र्यांच्या बैठकांनंतर अंतिम निर्णयाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याबाबत आपण प्रस्ताव तयार करीत असून, हा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे असल्याने व हे प्रकरण संपूर्ण राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने येथील लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी केंदूरकर आणि आपल्यासोबत बैठकीला आल्यास थिटेवाडीचा प्रश्न तातडीने सुटण्यास मदतच होईल, असेही आढळराव यांनी सांगितले.

Web Title: Meeting Thitewadi Issue Shivajirap Adhalrao Pail