"इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'कडून यामुळे चिमुकल्याची नोंद!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कळंब (ता. आंबेगाव) येथील शिवराज नितीन येवले हे एक वर्ष 11 महिन्यांचे बालक अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर किल्ले, औषधांची नावे, महाभारत-रामायणातील विविध व्यक्तींचा संदर्भ आणि ओळख अचूक सांगतो. त्याची दखल घेऊन त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये "स्प्लेंडीड चाइल्ड' या शीर्षकाखाली नोंदविले गेले आहे.

अवघ्या दुसऱ्या वर्षी सांगतोय किल्ल्यांची नावे, रामायण-महाभारतातील संदर्भ

घोडेगाव/महाळुंगे पडवळ (पुणे) : काल कुठली भाजी खाल्ली अथवा परवा रस्त्यात भेटलेल्या माणसाचे नाव लवकर आठवत नाही. पण, कळंब (ता. आंबेगाव) येथील शिवराज नितीन येवले हे एक वर्ष 11 महिन्यांचे बालक अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर किल्ले, औषधांची नावे, महाभारत-रामायणातील विविध व्यक्तींचा संदर्भ आणि ओळख अचूक सांगतो. त्याची दखल घेऊन त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये "स्प्लेंडीड चाइल्ड' या शीर्षकाखाली नोंदविले गेले आहे.

शिवराज हा औषधे (ऍलोपॅथी), शिवकालीन किल्ले (शिवनेरी, जंजिरा, हवामहाल, लालकिल्ला, प्रतापगड) यांची नावे तसेच, लहान मुलांची पुस्तके, इंग्रजी मुळाक्षरे, आठ रंग, फळे, वाहने, विविध देशांचे ध्वज, पालेभाज्या, प्राणी, मानवी अवयव, महाभारत-रामायणातील व्यक्तींचा संदर्भ आणि ओळख अचूकपणे सांगतो. या खेरीज भारतीय इतिहासातील अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्ती जसे डॉ. बाबासाहेब आंबडेकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, नेताजी बोस, महात्मा फुले यांची छायाचित्रेही पटकन ओळखतो.

शिवराजचे वडील नितीन येवले म्हणाले, ""शिवराजचे व्हिडिओ, फोटो व जन्मतारखेचा दाखला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविला होता. त्यानुसार सर्व बाबींची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्याला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्रही मिळाले आहे. शिवराजच्या कामगिरीची दखल घेतल्याने आनंद झाला.''
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memoirs of two year old boy in India book of records