माळीण दुर्घटनेच्या पत्रकाराने जागविलेल्या सुन्न करणाऱ्या आठवणी... 

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आंबेगाव तालुक्यातील दुर्गम माळीण गावावर सहा वर्षांपूर्वी 30 जुलै रोजी डोंगर कोसळला. निसर्गाच्या या कोपात 151 जणांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या दुर्घटनेच्या सकाळचे  मंचर येथील ज्येष्ठ बातमीदार डी. के. वळसे पाटील यांनी जागविलेल्या आठवणी...  

सहा वर्षांपूर्वीच्या मन सुन्न करणाऱ्या दुर्दैवी प्रसंगाची आजही आठवण काढली की, अंगाचा थरकाप होतो. आंबेगाव तालुक्यातील डोंगर कुशीत असलेले माळीण गाव सहा वर्षांपूर्वी झालेल्या निसर्गाच्या कोपात काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हे संपूर्ण गाव डोंगराखाली गाडलं गेलं. या घटनेमध्ये घरातील कोणाची आई गेली, तर कोणाचे वडील, भाऊ बहीण तर कोणाची मुले या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडली. भीती अजूनही या लोकांच्या मनात आजही पाहायला मिळते. 

पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच

३० जुलै २०१४ ची ती भयानक सकाळ आजही मला चांगली आठवते. या घटनेची माहिती सकाळी समजल्यानंतर मी तातडीने घटनास्थळी निघालो. हा संपूर्ण रस्ता हुतात्मा गेनू सागराच्याकडेने (डिंभे धरण) आहे. रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माळीण गावात मुसळधार पाऊस आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. ते वादळात सुरु असलेल्या पावसातही आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. नेमकी किती लोक मृत्यूमुखी पडले असतील, याचा सुरवातीला कोणालाही अंदाज आला नाही. सर्वजण भीतीच्या सावटाखाली होते. Image may contain: outdoor

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

डिंभे धरणाच्या पुढे माळीणकडे येण्यासाठी अपुरा रस्ता, कोसळत असलेला पाऊस व वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी मदत कार्य पोहचण्यास अडथळा निर्माण होत होता. अडथळा पार करत भीमाशंकर कारखान्याने पाठविलेले पोकलेन व जेसीबीचा ताफा तेथे आले. त्यांच्यानंतर एनडीआरएफचे जवानही तेथे आले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अधिकारी घटनास्थळी आले. देवेंद्र शहा, देवदत्त निकम, संजय गवारी, प्रकाश घोलप यांनी शरद बँक व गोवर्धन दूध प्रकल्पामार्फत कपडे, अन्नाची पाकिटे व दोन हजार बिसलरी बाटल्या मदत कार्यात सहभागी झालेल्या व्यक्ती व जखमींसाठी दिल्या. त्यामुळे मदत कार्य करणाऱ्यांच्या पोटाला आधार मिळाला.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले होते. दुपारपर्यंत २२ मृतदेह मिळाले होते. प्रमिला लेंभे (वय २४) या बाळाला छातीशी कवटाळून माती व भाताच्या पेंढ्याच्या ढिगाऱ्या खाली अडकल्या होत्या. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. वेळेत मदत कार्य मिळाल्यामुळे त्यांचा व बाळाचा जीव वाचला. मातीचे ढिगारे बाजूला करताना सर्वत्र सन्नाटा पसरला होता. आता कोणाचा मृतदेह दिसणार, यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले होते. रुग्णवाहिकाची ये-जा सरू होती. मृतदेहांची ओळख पटणे अवघड जात होते. सर्व मृतदेह जवळच असलेल्या आडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले. 

गावागावांत तयार होणार तळीरामांची यादी

चंद्रकांत घोडेकर, सुदाम बिडकर, अविनाश गुंजाळ, विवेक शिंदे, अरुण सरोदे, नवनाथ भेके आदी बातमीदारांची टीम माझ्या समवेत कार्यरत होती. प्रत्येकावर विविध प्रसंगाचे फोटो काढण्याची व क्षणचित्र संपादित करण्याची जबाबदारी सोपविली होती. सर्वजण हे दृश्य पाहून भयभीत झाले होते. कारण चिखल, पडणारा पाऊस व ह्दयाचे ठोके वाढविणारे प्रसंग क्षणाक्षणाला समोर होते. आडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मृतदेहांची माहिती मिळणार होती. त्यासाठी मी पायी जात होतो. संध्याकाळचे चार वाजले होते. तेथे मोबाईलची रेंज नसल्याने सकाळ संपादकीय विभागाशी संपर्क होत नव्हता. हे शल्य सतत जाणवत होते. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाहतूक कोंडीत गाडी अडकल्याने पायी येत असलेले सहयोगी संपादक रमेश डोईफोडे मला भेटले. ते म्हणाले, “तुम्ही ताबोडतोब मंचरला जा. जेवढा हातात मजकूर असेल व फोटो ताबोडतोब सकाळला पाठवा. त्यानुसार मी माघारी मंचरकडे निघालो. पण माझीही गाडी वाहतूक कोंडीत अडकली. माझ्या बरोबर विवेक शिंदे हे होते. आम्ही दोन किलोमीटर पायी चालत राहिलो. जर गाडीच मिळाली नाही तर वेळेत बातमी जाणार नाही, अशी भीतीही मनात निर्माण झाली होती. एका रुग्णवाहिकेला हात केला. योगायोगाने तो ओळखीचा निघाला. रुग्णवाहिकेत बसल्यानंतर वेळेत मंचरला पोहचण्याविषयी खात्री निर्माण झाली. संध्याकाळी सहाच्या दरम्यान डिंभे गाव आल्यानंतर मोबाईलला रेंज मिळाली. मुख्य उपसंपादक नयना निर्गुण यांच्या बरोबर संपर्क झाला. मंचरला आल्यानंतर बातमी व फोटो पाठविले. त्यानंतर रात्री अन्य सहकारीही आले. त्यांनीही व्यवस्थित मजकूर पाठविला. मात्र, ती दुर्घटना आज सहा वर्षांनंतर आठवल्यानंतरही अंगाचा थरकाप उडतो.

Image may contain: 1 person, closeup

माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी सकाळी झालेली ती दुर्घटना आजही सहा वर्षांनंतर आठवल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो. त्या आठवणींनी माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या आणि आमच्याही डोळ्याच्या कडा पाणवतात.
 - डी. के. वळसे पाटील
बातमीदार सकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memories evoked by journalist Dilip Walse Patil of Malin tragedy