
कृषी महाविद्यालयातील पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
पुणे : महाविद्यालयीन जीवनातील ५० वर्षांपूर्वीच्या त्या गोड आठवणी आणि मैत्री. यापैकी काही जण तर चक्क ५० वर्षांनी एकमेकांना भेटले. सर्वजण वयाच्या सत्तरीत असूनही जुन्या मित्रांच्या सहवासात आल्यामुळे आठवणींना उजाळा मिळाला. सर्वांना जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली. निमित्त होते, येथील कृषी महाविद्यालयातून १९७२ साली पदवी धारण केलेल्या पदवीधारकांच्या सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळाव्याचे.
येथील कृषी महाविद्यालयातून १९७२ सालच्या पदवीधारकांकडून सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. हा सुवर्णमहोत्सव कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार हा मेळावा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास ५० कृषी पदवीधर उपस्थित होते. या वेळी सर्वांत ज्येष्ठ उल्हास बाप्ते यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबाबत सत्कार करण्यात आला. वसंत जाधव हे मुंबई येथे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. राज्यपालांकडून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान सन्मान झाला आहे. या मेळाव्यात जाधव यांचा डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित पदवीधारकांतील नगर येथील मच्छिंद्र शिंदे यांचे पूत्र डॉ. अभिजित शिंदे यांनी मधुमेह रोग नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.
बी. बी. जाधव यांचा मंगळवेढा येथे स्वतःचा जकराया साखर कारखाना आहे. हा खासगी कारखाना त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी स्थापन करून उत्तम प्रकारे चालवला. त्यांनी या मेळाव्यात त्यांच्या कारखान्याची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. या मेळाव्यास सातारा, नगर, नाशिक, सोलापूर उस्मानाबाद, पुणे, मुंबई आणि विजापूर जिल्ह्यातून कृषी पदवीधर आले होते.
आता वर्षातून दोनदा भेटणार
या स्नेहमेळाव्यास उपस्थित प्रत्येकाला आपले आयुष्य पाच वर्षांनी वाढल्यासारखे वाटले. हाच आनंद लुटण्यासाठी सर्वांनी वर्षातून दोनदा एकत्र येण्याचे मान्य केले. काहींनी यापुढील मेळावा पुण्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आयोजित करावा, अशी सूचना केली. त्याला सर्वांनी मान्यता दिली.
Web Title: Memories Of Fifty Years Ago In College Of Agriculture
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..