मध्यमवयीन स्त्री-पुरुषही हौसेबरोबरच फिटनेससाठी घेताहेत नृत्याचे धडे 

मयूरी शिंदे 
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

यशस्वी होण्यासाठी वय हा मुद्दा नसतो, तर इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. अनेक डान्स क्‍लासमधून सध्या जे चित्र दिसते ते पाहिल्यावर ही गोष्ट अधोरेखीत होते.

पुणे - काही जण साठाव्या वर्षी वाहन चालविणे शिकतात, तर काही जण उतार वयात आणखी काही कौशल्य प्राप्त करण्यासाठी धडपडतात. केवळ धडपडतात नव्हे, तर त्यात यश मिळवतात. यशस्वी होण्यासाठी वय हा मुद्दा नसतो, तर इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. अनेक डान्स क्‍लासमधून सध्या जे चित्र दिसते ते पाहिल्यावर ही गोष्ट अधोरेखीत होते. पार्टीमध्ये किंवा कोणत्याही समारंभात आपल्यालाही नृत्याच्या काही "स्टेप्स' करता याव्यात, या हौशीसाठी 35 ते 45 वयोगटांतील स्त्री-पुरुषांचीही पावले आता डान्स क्‍लासकडे वळू लागल्याचे दिसते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पार्टी, वाढदिवस, लग्न-समारंभ तसेच ऑफिस किंवा उद्योग-व्यावसायिकांच्या औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रमांत डीजेच्या तालावर नृत्य करण्याचा "ट्रेंड' आता रूढ होऊ लागला आहे. तसेच शहरांतील सोसायट्यांमध्ये अलीकडे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने "फॅमिली डान्स स्पर्धा' होतात. त्यात आपल्यालाही नृत्य करता यावे, अशी अनेक मध्यमवयीन स्त्री-पुरुषांची इच्छा असते. त्यामुळे नोकरदार असो वा व्यावसायिक, त्यांची पावले डान्स क्‍लासकडे वळू लागली आहेत. डान्स क्‍लासचालकांनीही त्यांच्यासाठी आता शनिवार-रविवारी बॅचेस ठेवल्या आहेत अन्‌ त्यासाठी दरमहा किमान एक हजार रुपयांपासून पुढे शुल्क आकारले जाते. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आयटी क्षेत्रातील "पार्टी कल्चर'मध्ये अनेकांना नृत्याचा न्यूनगंड असतो. त्यामुळे आयटीयन्सचा कल डान्स क्‍लासेसकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याबाबत "फुटलूज डान्स ऍकॅडमी'चे यश गांधी म्हणाले, ""रोजच्या धकाधकीच्या दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ देणे, शरीरस्वास्थ राखणे तसेच छंद जोपासण्यासाठीही बऱ्याच जणांचा नृत्याकडे कल आहे.'' 

टीव्ही, डान्स रिऍलिटी शो, "टिक-टॉक' यामुळे नृत्याची क्रेझ वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्यालाही नृत्याच्या काही स्टेप्स याव्यात, अशी अनेकांची इच्छा असते व ती या क्‍लासच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे "आर्ट हब'चे धनराज कांबळे यांनी सांगितले. 

"एसएमबी डान्स अरीना'चे सागर बराटे म्हणाले, ""स्त्रियांसोबतच पुरुषही नृत्य शिकण्यात आता मागे नाहीत. बॉडी ऍनालिसिस करून मर्यादित फूट मूव्हमेंट्‌स आणि वैशिष्ट्यपूर्ण अप्पर बॉडी मूव्हमेंट याचा समन्वय साधून सोप्या पद्धतीने त्यांना नृत्य शिकविले जाते.'' 

नृत्य हे एकेकाळी महिलांपुरतेच मर्यादित असल्याचा समज होता. परंतु, आता नृत्याचे प्रशिक्षण घेण्याऱ्या पुरुषांचेही प्रमाण वेगाने वाढत आहे. त्याला वयोगटाचे बंधन राहिलेले नाही. 
- शामक दावर, नृत्य दिग्दर्शक 

माझी डान्स शिकण्याची लहानपणीची इच्छा गेल्या नऊ वर्षांपासून पूर्ण करीत आहे. आता पंचेचाळीशीत असताना शारीरिक तंदुरुस्ती राखणे, ताणतणावापासून दूर राहणे यासाठी नृत्यातील विविध प्रकार शिकत आहे. 
- नेहा आठले 

मुलीच्या डान्स शो साठी पहिल्यांदाच डान्स केला. त्यानंतर आवड निर्माण झाली. आता अडतीसाव्या वर्षीही मी डान्स शिकत आहे. 
- दीपक शिंदे, शिकाऊ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men and women are also taking dance lessons for fitness