पुणे - मनोरुग्णांच्या संख्येत होतेय वेगाने वाढ

पुणे - मनोरुग्णांच्या संख्येत होतेय वेगाने वाढ

पुणे-  सुनील हा अवघा 18 वर्षांचा. महाविद्यालयात शिकणारा; पण याचवेळी त्याला करिअरच्या चिंतेने ग्रासले. पुढं नेमकं काय करायचं, हेच त्याला उमगेना. मग फक्त विचार आणि विचारच. त्यातूनच त्याला मनोविकारानं घेरलं... सुनीलसारखीच व्यथा एका चाळीसवर्षीय नोकरदार महिलेची. ऑफिसमधील वाढत्या दडपणामुळे त्यांनाही या विकारानं पछाडलं. सुदैवानं वेळीच मिळालेल्या उपचारानं या दोघांचंही दैनंदिन जीवन पूर्वपदावर आलं खरं; पण या विकाराचं मूळ स्वत-च शोधलं तर त्यापासून आपण नक्कीच दूर राहू, हे मात्र नक्की! 

वीस टक्के रुग्ण उपचाराविनाच 
बदलती जीवनशैली, स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव यामुळे मनोरुग्णांची संख्या वाढते आहे. शहरी भागात त्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र, एकुणातील 20 टक्के रुग्ण उपचारांपासून वंचित राहत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 

जीवनशैलीचाही परिणाम 
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, सोशल मीडिया आदींमुळे जीवनशैलीत आमूलाग्र बदल होताहेत. व्यायाम, पुरेशा झोपेचा अभाव, गॅजेट्‌सच्या वापराचा अतिरेक यांचा विपरित परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. शारीरिक आजारांएवढे मनोविकारांकडे लक्ष दिले जात नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते दिले तर या विकारापासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. 

ताणतणावाची कारणे 
- बदलेल्या जीवनशैलीतून निर्माण झालेल्या समस्या 
- वाढती स्पर्धा आणि त्यापुढे टिकण्याचे आव्हान 
- खुल्या संवादाचा अभाव, दडपण, तुलना 
- व्यसनाधीनता, प्रतिष्ठेचे खोटे समज 
- संयमाचा अभाव, परिणामी नकार पचविण्याची क्षमता कमी होणे 

निरोगी मानसिक आरोग्यासाठी 
- कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा 
- व्यायाम, वाचन यावर भर दिला पाहिजे 
- संगीत, योगासने, ध्यानधारणा आवश्‍यक 
- छंद, सामाजिक संवादात सहभाग 
- "गॅजेट'च्या अतिआहारी जाणे टाळावे 

आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. विविध वयोगटांतील रुग्ण औषधोपचार, समुपदेशन आदी उपचार करून घेत आहेत. या रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. 
- डॉ. अभिजित फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय 

मनोविकार असलेल्या रुग्णांना आधार म्हणून "परिवर्तन' काम करते. समुपदेशनाबरोबरच कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत-च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. 
- डॉ. हमीद दाभोळकर, विश्‍वस्त, परिवर्तन ट्रस्ट 

शहरी भागात आधुनिक जीवनशैलीमुळे एकटे जगण्याकडे लोकांचा कल आहे; तर ग्रामीण भागात कौटुंबिक बंध घट्ट असतात. म्हणून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मानसिक रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. 
- नेहा साठे, अभ्यासक 

तणाव वाढण्यास आधुनिक जीवनशैली आणि इंटरनेटचा वाढता वापर कारणीभूत आहे. "सोशल मीडिया'चे आभासी जग खरे मानून स्वत-चे आयुष्य आखण्याचा प्रयत्न तसेच इतरांसारखे आयुष्य जगण्याचा तरुण पिढीचा अट्टाहास असतो. 
- आरती पेंडसे, मानसोपचारतज्ज्ञ 

मानसिक रुग्णांचा आपल्या भावनांवर ताबा नसतो, त्यामुळे नातेवाईक, मित्र यांनी अशा रुग्णांना समुपदेशनासाठी प्रोत्साहन द्यावे, कारण ते औषधांपेक्षा परिणामकारक आहे. 
- श्रुती सोमण, समुपदेशक 

प्रमुख मनोविकार आणि त्यांची लक्षणे  
स्किझोफ्रेनिया : स्वत-शी बडबडणे, शांत राहणे, आवाजाचा भास होणे, बोलताना अडथळणे, झोपून राहणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे. 
मॅनिया - अतिआनंदी, उत्साही भावना निर्माण होणे, बडबडणे, विरोध केल्यास वाद घालणे. 
स्मृतिभ्रंश - विस्मृती, संभाषणाचा ऱ्हास, दैनंदिन कामे करण्यावर मर्यादा, विचारशक्ती कमी होणे. 
फिट्‌स - नैराश्‍य येणे, रक्तदाब कमी होणे, श्‍वसनाचा वेग मंदावणे, शरीरावरील नियंत्रण कमी होणे. 
उदासीनता - झोपून राहणे, निरस वाटणे, हळू आवाजात बोलणे, स्वत-शी संवाद साधणे, वारंवार भावनावश होणे. 

येरवडा मनोरुग्णालयातील पाच वर्षांतील रुग्णांची संख्या 
------ वर्ष ----------महिला -----------पुरुष 
- 2014-15 --------9,751----------20, 559 
- 2015-16-------10, 133---------21, 968 
- 2016-17--------11, 174---------23, 566 
- 2017-18--------12, 522---------25, 490 
-2018- 19 -------12, 632------- 26, 010 

----------------- 
(वृत्त संकलन - वर्षा वाघजी, मयूरी शिंदे, स्वप्नील करळे, कुणाल कुंजीर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com