आम्ही 'रेड टेप'चे 'रेड कार्पेट' केले- फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

फडणवीस म्हणाले, "‘मैत्री‘सारख्या प्रयोगाचा फायदा होत आहे. पर्यावरण विभागाच्या ‘फॅसिलिटेट अँड रेग्युलेट‘चाही फायदा पुण्याला स्टार्टअप हब बनवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या क्षेत्रात बंगळुरूलाही मागे टाकण्याची क्षमता पुण्यात आहे. यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल."

पुणे- पुणे हे पूर्वेचे डेट्रॉईट शहर आहे. ‘मेक इन इंडिया‘मध्ये खऱ्या अर्थाने democracy (लोकशाही), demography (लोकसंख्या) आणि demand (मागणी) या 3D चा फायदा घ्यायला हवा. आम्ही लालफितीचे (रेड टेप) रुपांतर रेड कार्पेटमध्ये केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मर्सिडीझ बेन्झसाठी इंजिनाची जोडणी करणाऱ्या फोर्स मोटर्सच्या चाकण येथील नव्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या नव्या प्रकल्पामध्ये वर्षाला २० हजार इंजिने आणि गाड्यांचे पुढचे आणि मागचे प्रत्येकी २० हजार ऍक्सल बनवता येतील. गरजेप्रमाणे ही क्षमता वाढवताही येईल.

फोर्स मोटर्स आणि मर्सिडीझ बेन्झच्या ४५ वर्षांपासूनच्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा असल्याचे, फोर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले. या प्रकल्पातील आठ जोडणी सुविधांमध्ये मर्सिडीझ बेन्झच्या सर्व गाड्यांना लागणारी चौदा प्रकारची इंजिने बनवण्यात येणार आहेत. 

कार्यक्रमाला केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पॉवरटेन मर्सिडीझ बेन्झचे ग्लोबल हेड फ्रॅंक डाईस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, ‘सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुमारे १ लाख ३० हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेला हा नवा प्रकल्प फोर्स मोटर्सच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे. फोर्स मोटर्सने या प्रकल्पात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून पुढच्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने आणखी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. फोर्स मोटर्स मर्सिडीझ बेन्झला आतापर्यंत ६० हजारपेक्षा जास्त इंजिने आणि ५० हजारांहून अधिक ऍक्सल पुरवले आहेत.

Web Title: mercedes benz starts production near Pune