मीटर रीडिंगचा प्रवास... मॅन्युअल ते मोबाईल ॲप!

- निशिकांत राऊत
रविवार, 15 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

ग्राहकाला विजेचा शॉक बसतो तो बिलाच्या माध्यमातून. त्याची तीव्रता कमी करण्याच्या अव्याहत प्रयत्नातूनच आता मोबाईल ॲपद्वारे रीडिंग घेण्याची सुविधा केली आहे. त्याने कामकाजात अधिक पारदर्शकता आणता आली आहे.

‘महावितरण’च्या वीजबिलाच्या प्रक्रियेत मीटर रीडिंग हा आत्मा आहे. पूर्वी घरोघरी जाऊन मीटरमधील आकडे नोंदवून त्यानंतर वीजबिल तयार करण्याचा मीटर रीडिंगचा प्रवास आता ‘डिजिटल’ झाला आहे. मीटर रीडिंगची प्रक्रिया आता मोबाईल ॲपद्वारे होत असल्याने वीजबिल तयार करण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. रीडिंगचा फोटो काढण्यापासून ते मोबाईल ॲपद्वारे मीटर रीडिंग घेण्यापर्यंतची प्रक्रिया ‘महावितरण’च्या ग्राहकांमध्ये विश्वासार्हता आणि पारदर्शकता निर्माण करणारी आहे. या महत्त्वाच्या टप्प्यातील तंत्रज्ञान ‘महावितरण’ने स्वतः विकसित केले आहे.

तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानंतर वीज वितरणासाठी महावितरण कंपनी अस्तित्वात आली. मीटर रीडिंगच्या तक्रारी येत असल्याने २००५ च्या सुमारास नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे निराकरण करताना संबंधित ग्राहकांकडील मीटरच्या रीडिंगचे फोटो काढण्यात येत होते. ते वीजबिलामध्ये प्रसिद्ध केल्यास ग्राहकांच्या तक्रारी राहणार नाहीत या उद्देशाने ‘महावितरण’ने सॉफ्टवेअर विकसित केले. देशात प्रथमच वीजबिलावर मीटर आणि त्यामधील रीडिंगचा फोटो छापण्यास सुरवात झाली. परिणामी, बिलाबाबतच्या तक्रारींत पुष्कळशी घट झाली. हा पहिला टप्पा यशस्वी झाला तरी त्यात काही प्रमाणात मानवी हस्तक्षेप कायम राहिला. 

ग्राहकसेवेच्या डिजिटल विस्तारीकरणात महत्त्वाकांक्षी स्वप्न मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून ‘महावितरण’ने प्रत्यक्षात आणले. सुमारे दोन कोटी ४० लाख ग्राहकांसाठी विविध सेवा समाविष्ट करून नवीन मोबाईल ॲपची निर्मिती केली. यात ‘महावितरण’च्या मीटर रीडिंग ॲपमध्ये अचूकता अधिकाधिक राहील, असे प्रयत्न आहेत. जेथे इंटरनेट सुविधा नाही तेथील मीटरचे ऑफलाइन रीडिंग घेण्याची सोय ॲपमध्ये आहे. या प्रक्रियेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून ‘महावितरण’ने ग्राहकसेवेतील ‘डिजिटल’चा मोठा पल्ला गाठला आहे. 

Web Title: meter reading journey, manual to mobile app