मेट्रोसाठी आता डब्यांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

असे असतील मेट्रोचे डबे 
  शहरातील दोन मार्गांवर प्रत्येकी ३ डब्यांच्या ३४ मेट्रो (रेक) धावणार  
  पहिल्या टप्प्यात अर्ध्या तासाला मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होणार 
  प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर ही वारंवारिता ९० सेकंदांपर्यंत येणार  
  प्रतितास ९५ किलोमीटर वेगाने मेट्रो धावणार
  एका डब्याची लांबी सुमारे २२ मीटर, तर रुंदी ३ मीटर असेल
  एका डब्याचे वजन सुमारे १६ टन असेल 
  एका डब्यातील प्रवासीसंख्येची क्षमता सुमारे ३००
  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सर्व डबे नियंत्रण कक्षाला जोडलेले असतील
  अग्निशमन उपकरणे आणि इमर्जन्सी बटन

अत्याधुनिक सुविधा 
  संपूर्णतः वातानुकूलित
  स्वयंचलित दरवाजे 
  एलईडी स्क्रीनवर डिजिटल रूट मॅप
  स्थानकाची माहिती देण्यासाठी स्पीकर्स 
  मोबाईल, लॅपटॉपसाठी चार्जिंग पॉइंट्‌स 
  ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी राखीव आसने
  व्हीलचेअरही सहज प्रवेश करू शकेल अशी दरवाजांची रचना

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे डबे तयार करण्याचे काम एका महिन्यात सुरू होणार आहे. दोन्ही शहरांतील मार्गावर मेट्रोचे ११२ डबे धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे.

त्यापैकी एका कंपनीला लवकरच काम सुरू करण्याचा आदेश देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मेट्रोमार्गांचे सध्या काम सुरू आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ५ ते ६ किलोमीटर अंतरावर पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी मेट्रो धावेल, असे महामेट्रोचे नियोजन आहे.

त्यासाठीची कामे सध्या सुरू आहेत. त्याअंतर्गतच मेट्रोचे डबे (कोचेस) तयार करण्यासाठीची निविदा १३ ऑगस्ट रोजी उघडण्यात आली आहे. छाननी पूर्ण झाल्यावर लवकरच संबंधित कंपनीला डबे तयार करण्याचे काम सुरू करण्याचा आदेश देण्यात येईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

डबे - ११२
एकूण खर्च - १२०० कोटी

मेट्रोचे डबे (कोचेस) तयार करण्यासाठी निविदा उघडण्यात आली आहे. त्याचे काम महिनाभरात सुरू होईल. पुण्यातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांच्या मेट्रो डब्यांतून प्रवास करता येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 
- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Bogie Preparation Pimpri Chinchwad