मेट्रोबाबत पीएमआरडीएची बाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी मागविल्या जागतिक निविदा

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी मागविल्या जागतिक निविदा
पुणे - मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महापालिकेच्या पाठीमागून येत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बाजी मारली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो मार्गासाठी पीएमआरडीएने जागतिक (ग्लोबल) निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्प राबविण्यात पीएमआरडीचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

पुणे महानगराचा गतीने विकास करण्यासाठी सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने पीएमआरडीएची स्थापना केली. स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच पीएमआरडीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिल्ली मेट्रोला या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिले होते. तीन महिन्यांत दिल्ली मेट्रोने हे काम पूर्ण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत या मार्गाला मान्यता देण्यात आली होती.

त्यानंतर आता या प्रकल्पाच्या उभारण्यासाठी पीएमआरडीकडून जागतिक (ग्लोबल) निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा भरण्याची अंतिम मुदत 17 एप्रिल आहे. त्यानंतर निविदा उघडून पात्र कंपन्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर पात्र कंपन्यांकडून पुन्हा निविदा मागवून त्यापैकी एका कंपनीला काम दिले जाणार आहे. या संदर्भात पीएमआरडीचे आयुक्त महेश झगडे म्हणाले, ""मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यातील या निविदा आहेत. त्यामध्ये कामास पात्र असलेल्या कंपन्या निश्‍चित करण्यात येणार आहेत.''

सुमारे साडेतेवीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर प्रत्येक हजार मीटरवर एक याप्रमाणे एकूण 23 स्थानके असतील, तर हिंजवडी येथील एमआयडीसीच्या 55 एकर जागेवर मेट्रोसाठी स्वतंत्र डेपो उभारण्यात येणार आहे. हिंजवडी-मेगापोलिस-विप्रो चौक, शिवाजी चौक, वाकड उड्डाण पूल, बालेवाडी स्टेडियम-विद्यापीठ चौक, आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर न्यायालय असा मेट्रोचा मार्ग राहील. शिवाजीनगर येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास हा मार्ग जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण पाच हजार 964 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2020 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीकडून ठेवण्यात आले आहे. मेट्रोच्या तिकिटाचा दर साधारणतः आठ रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत राहणार आहे.

प्रकल्पातील ठळक बाबी
-हिंजवडी ते शिवाजीनगर 23.3 किलोमीटर लांबीचा मार्ग
-संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड
-प्रकल्पाचा खर्च पाच हजार 964 कोटी
-मार्गावर एकूण 23 स्थानके
-शिवाजीनगर न्यायालय येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास जोडणार
-हिंजवडी येथील एमआयडीसीच्या 55 एकर जागेवर मेट्रोसाठी डेपो
-2020 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट
-पीपीपी आणि बीओटीचा पर्याय

Web Title: metro pmrda