मेट्रो प्रकल्पासाठी पुनर्वसनाचे काम सुरू करा - म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

पुणे - मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत विभागीय आयुक्तालयात मंगळवारी डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, महामेट्रोचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहळकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडपट्टीधारकांचे एकत्रित पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्‍यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित झोपडपट्टीधारकांच्या प्रतिनिधींसोबत येत्या 15 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी. महामेट्रो, पीएमआरडीए, पुणे महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून पुनर्वसनाची कार्यवाही करावी.
या वेळी जिल्हाधिकारी राम यांनी मेट्रो मार्गातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाबाबत; तसेच पुनर्वसनाच्या जागांबाबत माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Project Rehabilitation work start deepak mhaisekar