मेट्रो प्रकल्प असणार "इको फ्रेन्डली'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - शहरातील मेट्रो प्रकल्प हा पर्यावरणपूरक असेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात येणार असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पासाठी "महामेट्रो कंपनी' स्थापन करण्यात आली असून, पिंपरी-शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाचे काम पहिल्यांदाच सुरू होणार आहे.

पुणे - शहरातील मेट्रो प्रकल्प हा पर्यावरणपूरक असेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात येणार असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पासाठी "महामेट्रो कंपनी' स्थापन करण्यात आली असून, पिंपरी-शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाचे काम पहिल्यांदाच सुरू होणार आहे.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, ""पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोमार्गाचे अंतर 16.139 किलोमीटर असून, त्यातील साधारण 5 किलोमीटरचा मार्ग (शिवाजीनगर ते स्वारगेट) हा भुयारी आहे. उर्वरित मार्ग जमिनीवरून (एलिव्हेटेड) असेल. या मार्गात एकूण 15 स्थानके आहेत. वनाज ते रामवाडी हे अंतर 14.665 किलोमीटरचे असून, त्यावर 16 स्थानके आहेत. हा संपूर्ण मार्ग जमिनीवरून आहे.''

भुयारी मार्गाची खोली 12 मीटर व जमिनीवरील मार्गाची उंची 12 मीटर असेल. जमिनीवरील मार्गासाठी कॉंक्रीटच्या गर्डर्सची उभारणी केली जाणार आहे. दोन्ही मार्गांवरची स्थानके तीन मजली असतील. पहिला मजला प्रवाशांची ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. दुसरा मजला तिकीट काढण्यासाठी व प्रवाशांना थांबण्यासाठी व तिसरा मजला थेट रेल्वेत जाण्यासाठी असेल. स्थानकांच्या उंचीनुसार रेल्वेची उंची बदलेल, असेही दीक्षित यांनी सांगितले. कंपनीचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम या वेळी उपस्थित होते.

तासी वेग 80 किलोमीटर
मेट्रोचा वेग प्रतितास 80 किलोमीटर असेल. सुरवातीचा टप्पा 2018 मध्ये पूर्ण झाल्यानंतर दररोज साधारण 3 लाख 82 हजार 577 प्रवासी गृहीत धरण्यात आले आहेत. हे काम पुढे सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोचा वापर करतील. या प्रकल्पासाठी येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होईल, असेही ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
-संपूर्ण मेट्रो असेल वातानुकूलित
-ऑटोमॅटिक तिकीट आकारणी यंत्रणा
-स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल
-सौरऊर्जा वापराला प्राधान्य
-स्थानकांवर 24 तास सीसीटीव्ही यंत्रणा
-वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर
-कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान
-वाहनतळ सुविधाही उपलब्ध करणार
-महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी विशेष सुविधा

Web Title: Metro project will be "eco-friendly"