मेट्रो आवश्‍यकच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर तोडगा म्हणून एक सक्षम व सुयोग्य मेट्रो रेल्वे उभारण्याची आवश्‍यकता आहे. शहराची रचना लक्षात घेता यापुढील मेट्रो भूमिगत करण्याला प्राधान्य द्यायला हवे. मेट्रोचा खर्च आणि परतावा याकडे अधिक लक्ष केंद्रित न करता त्यामुळे होणाऱ्या सोयीचा विचार करून मेट्रोचे जाळे उभारावे, असा सूर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पावरील चर्चासत्रात निघाला. 

पुणे - पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर तोडगा म्हणून एक सक्षम व सुयोग्य मेट्रो रेल्वे उभारण्याची आवश्‍यकता आहे. शहराची रचना लक्षात घेता यापुढील मेट्रो भूमिगत करण्याला प्राधान्य द्यायला हवे. मेट्रोचा खर्च आणि परतावा याकडे अधिक लक्ष केंद्रित न करता त्यामुळे होणाऱ्या सोयीचा विचार करून मेट्रोचे जाळे उभारावे, असा सूर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पावरील चर्चासत्रात निघाला. 

दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनिअर्स आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पावर चर्चासत्राचे आयोजन केले. त्यात कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, भारतीय रेल्वे अधिकारी प्रशिक्षण संस्थेतील अतिथी व्याख्याता दिलीप भट, नगररचना तज्ज्ञ अनघा परांजपे- पुरोहित सहभागी झाले. 
डॉ. गोखले म्हणाले, ""मेट्रो प्रकल्प शहरातील मोजक्‍या लोकांसाठी उभारला जात आहे. पेट्रोल, डिझेलसह इतर अनेक गोष्टींवर अधिभार लागेल. मेट्रो स्टेशनवर अथवा मार्गालगत वाहनतळाचे नियोजन नाही. वनाज ते रामवाडी हाच मेट्रो मार्ग का निवडला गेला, याचे उत्तर नाही. मेट्रोची सेवा ठराविक भागापुरती असल्यानेच भारतीय रेल्वेने हा प्रकल्प उभारण्यास नकार दिला. शहराची सध्याची वास्तव परिस्थिती मेट्रोसाठी अनुकूल नाही.'' 

भट म्हणाले, ""मेट्रो ही नागरिकांच्या हिताची आहे. ती सक्षम असावी. तसेच नागरिकांना कमी कष्टात ती मिळावी, यासाठी ती भूमिगत उभारली जावी. तसे झाल्यास नदीपात्रावरही काही परिणाम होणार नाही. हलक्‍या क्षमतेच्या प्रणालीचा वापर केल्यास प्रवासी संख्येची पूर्तता सहज होईल. वनाज- रामवाडी या मार्गासाठी भूमिगतचा पर्याय वापरल्यास आक्षेप दूर होतील.'' 

चटई निर्देशांकाच्या अनुषंगाने नागरिकांच्या मनातील शंकांचे निराकरण महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी केले. सूत्रसंचालन वसंत शिंदे यांनी केले. यशवंत घारपुरे यांनी प्रास्ताविक केले, तर विनय र. र. यांनी आभार मानले. 

पुण्यात प्रत्येक गोष्टीत आक्षेप असतोच. परंतु, टोकाच्या भूमिका घेऊन चर्चेत अडकण्यापेक्षा सुवर्णमध्य काढावा. सुविधा उभारताना थोडा त्रास होतोच. खर्च, त्रास होतोय म्हणून त्या सुविधा उभारायच्याच नाहीत, असा विचार योग्य नाही. 
- अनघा परांजपे, नगररचना तज्ज्ञ 

मेट्रो प्रकल्प उभारताना पायाभूत सुविधांवर ताण येईल. अडथळ्यांवर मात करून पुढे जायला हवे. अडचणींवरच चर्चा करीत राहिलो, तर महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच राहतील. 
- विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो 

Web Title: Metro require