मेट्रोसाठी आरक्षणामध्ये बदल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

‘त्या’ जागा आता निवासी भागामध्ये
कसबा पेठेतील एका जागेवर भाजी मंडई, तर दुसऱ्या जागेवर शाळेचे आरक्षण आहे. या जागांचा झोनबदल करून त्यांचा निवासी भागात समावेश करण्यासाठीदेखील राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

पुणे - मेट्रो प्रकल्पासाठी शहरातील पाच ते सहा जागांचे झोनबदल करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती आणि कसबा पेठ येथील जागांचा समावेश आहे. झोनबदल झाल्यानंतर त्या जागांवर मेट्रो स्टेशन उभारणे शक्‍य होणार आहे.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट यदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिकांच्या हद्दीत मेट्रोचे स्टेशन आहेत. पिंपरी ते स्वारगेट यादरम्यानच्या मार्गावर १४ स्टेशन आहेत. त्यापैकी काही स्टेशन हे निवासी जागांवर आहेत. शिवाजीनगरमधील भांबुर्डा, पर्वती, कोथरूड आणि कसबा पेठे येथील स्टेनशनच्या जागेवर ‘सार्वजनिक निमसार्वजनिक’ (पीएसपी) झोन आहेत. त्यामुळे या जागांचे झोनबदल करण्याची आवश्‍यकता होती. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या जागांवर मेट्रो स्टेशन उभारणे अथवा व्यावसायिक वापरासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्यास मदत होणार आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या असल्याचे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Reserve Place Changes