#PuneMetro  मेट्रो सातारा रस्त्यावरच हवी

#PuneMetro  मेट्रो सातारा रस्त्यावरच हवी

स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रोची अलाइनमेंट निश्‍चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सध्या पीएमपी हाच एकमेव पर्याय आहे. परंतु पीएमपीच्या सेवेबद्दल प्रवासी समाधानी नाहीत. बीआरटी कधी सुरू होईल, याबाबतही अनिश्‍चितता आहे. परिणामी, खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सातारा रस्त्यावरील कोंडी वाढत आहे. म्हणूनच मेट्रो लवकर झाली, तर आधार मिळेल, असे कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, परिसरांतील बहुसंख्य प्रवाशांना वाटते. 

योगेश खैरे (कात्रज) - कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी या भागांतील लोकसंख्या वाढलेली आहे. सध्याची सार्वजनिक वाहतूक  अपुरी पडत आहे. त्याचप्रमाणे या सर्व भागातून लोक कात्रजमध्ये येत असल्याने कात्रज हे मोठे जंक्‍शन होऊ शकते. त्यामुळे कात्रजपर्यंत मेट्रो नेणे भविष्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. वास्तविक बीआरटी मार्गाची रचना करताना आत्ताच तशी योजना करणे आवश्‍यक होते.

विकास फाटे (कात्रज) -  शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सातारा रस्ता आणि शहराचे दक्षिण प्रवेशद्वार कात्रज परिसरात वाढलेली लोकसंख्या सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे. मेट्रो कात्रजपर्यंत आणणे ही काळाची गरज आहे. प्रवासी संख्येचा महापूर असलेल्या परिसराला मेट्रो देणे अत्यावश्‍यक आहे. 

प्रशांत काळे  (कात्रज-कोंढवा रस्ता) - कात्रज परिसर दक्षिणेतील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तसेच, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्‍यांतून पुण्याकडे येणाऱ्या लाखो प्रवाशांना आधुनिक प्रवासी व्यवस्था देणे आवश्‍यक आहे. कात्रज चौकात निर्माण होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला मेट्रो हाच एकमेव पर्याय आहे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

 बाळकृष्ण भोसले  (भारती विद्यापीठ परिसर) - पुढील ५० वर्षांचा विचार करून कात्रजपर्यंत मेट्रो आणणे ही काळाची गरज आहे. सध्याची प्रवासी संख्या कोणत्याही वाहतूक व्यवस्थेला पेलणारी नाही. पुण्यासह हिंजवडी, पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक दिली, तरच स्मार्ट सिटी  सफल होईल. 

 माया जोशी  (सुखसागरनगर) - कात्रजपर्यंत मेट्रो म्हणजे नागरिकांच्या दृष्टीने ती एक उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरेल. पीएमपी सर्वच प्रवाशांना न्याय देऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक व्यवस्थेने या भागातील वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. प्रदूषणावर मात करणारी किफायतशीर मेट्रो प्रवाशांसाठी फायद्याची ठरेल, मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्‍यकता आहे.

 सायली जगताप (धनकवडी) - कात्रज ते निगडी हा मार्ग मेट्रोसाठी फायद्याचा आहे. शहरालगत समाविष्ट होत असलेल्या गावांचा समावेश आणि वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारी प्रवासीसंख्या केवळ मेट्रोच सामावून घेऊ शकते. सर्वसामान्यांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा देणे यासाठी प्रशासनिक तडफ लागते, तीच सध्या दिसत नाही.

 मधुरा महाडिक (गंगधाम फेज २) - उपनगरांचा विकास पाहता शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून, वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा रस्त्यावर मेट्रो प्रकल्प झाला, तर भविष्यात रस्त्यांवरील वाहतुकीत बदल होऊन पुढच्या पिढीचे आरोग्य चांगले राहील.

 अनुजा निलूरकर (गणात्रा कॉम्प्लेक्‍स, कोंढवा रस्ता ) - सातारा रस्त्यावरील मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करता येऊन वारंवार होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. उपनगरीय भागातून शहराच्या मध्य वस्तीमध्ये जाताना पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल.

 मेधा दीक्षित (प्रेमनगर सोसायटी ) - सातारा रस्त्यावर मेट्रो प्रकल्प झाल्यावर मेट्रोच्या वाहतुकीचा नागरिकांना फायदा होणार असून, वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल. सार्वजिनक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे घराघरांत दोन ते तीन दुचाकी झालेल्या असून, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली आहे. मेट्रो प्रकल्पामुळे जलद सार्वजनिक वाहतुकीचा वापर नागरिक करतील.

 भाविका पंखावाला (गंगाधाम फेज २ ) - रेल्वेच्या लोकल सेवेपेक्षा मेट्रोची सेवा अधिक सक्षम व सुरक्षित आहे. सातारा रस्त्यावरील मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या दक्षिण भागातील ग्रामीण भाग शहराशी जोडला जाऊन शहरात येणाऱ्या वाहनांवर मर्यादा येतील. जागतिक स्तरावर मेट्रोबाबत अनेक फायदेच आहेत. 

 स्वप्निल शेळके (शेळकेवस्ती, अप्पर ) - सातारा रस्त्यावर मेट्रो आल्यावर वाहतुकीचा ताण कमी होईल, मेट्रो प्रकल्पामुळे वाहनांपेक्षा मेट्रोचा प्रवास नागरिकांना जलद व सुरक्षित वाटेल.

 बालाजी वाघमारे (सुखसागर नगर) - सातारा रस्त्यावर मेट्रो सुरू झाली, तर पिंपरी-चिंचवड व नगर रोडवर जाण्यासाठी खूपच कमी वेळ लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये मोठा बदल होऊन नागरिक मेट्रोने प्रवास करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com