मेट्रो स्थानकावर उभारणार शिवसृष्टी - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

शिवसृष्टी हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे शिवसृष्टीसाठी पक्ष आग्रही राहणार आहे. मेट्रोचेही काम तातडीने मार्गी लागले पाहिजे.

पुणे - कोथरूडमध्ये शिवसृष्टी आणि मेट्रो स्टेशन संयुक्तरीत्या उभारण्याचा मानस पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. या बाबत तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले. मेट्रोचे स्थानक भुयारी करून त्यावर शिवसृष्टी उभारण्याचाही पर्याय पुढे आला आहे. त्यावर महामेट्रोच्या माध्यमातून विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्यात कोथरूडमध्ये कचरा डेपोच्या पूर्वीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प भाजपने केला आहे. मात्र त्याच ठिकाणी वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचे नियोजित स्थानक आणि डेपो आहे. कोथरूड परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर हेदेखील गेल्या पाच वर्षांपासून शिवसृष्टीसाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांचा महापालीकेकडे पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेने या बाबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (डीएमआरसी) त्यांचे मत विचारले होते. या ठिकाणी मेट्रोचे स्थानक किंवा शिवसृष्टी यापैकी एकच काही तरी होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपने जाहीरनाम्यात शिवसृष्टीचा समावेश केला आहे. त्या बाबत विचारणा केली असता बापट म्हणाले, "शिवसृष्टी हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे शिवसृष्टीसाठी पक्ष आग्रही राहणार आहे. मेट्रोचेही काम तातडीने मार्गी लागले पाहिजे. मात्र मेट्रो स्थानक आणि शिवसृष्टी हे एकाच ठिकाणी होऊ शकेल का, यासाठी आणखी काही तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल. त्यातून सहमती निर्माण करून शिवसृष्टी साकारता येऊ शकेल, असा विश्‍वास आहे.'' 
 

Web Title: Metro station sivasrsti build says Girish Bapat