मेट्रो स्थानकाचे काम वेगात

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 11 जून 2018

पुणे - मेट्रोच्या पहिल्या संत तुकारामनगर स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानकाच्या खांबांना ‘पिलर आर्म’ बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या बाहेरील बाजूला पुणे-मुंबई रस्त्यावर या मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे.

पुणे - मेट्रोच्या पहिल्या संत तुकारामनगर स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानकाच्या खांबांना ‘पिलर आर्म’ बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या बाहेरील बाजूला पुणे-मुंबई रस्त्यावर या मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे.

पिंपरी महापालिका ते रेंजहिल्स या दरम्यान नऊ स्थानके आहेत. तीन महिन्यांपूर्वी स्थानकाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वल्लभनगर बसस्थानकाच्या आवारात झाले. दहा खांबांवर स्थानक उभारण्यात येईल. मेट्रोच्या अन्य खांबांच्या तुलनेत स्थानकाचे खांब जास्त जाडीचे व एकमेकांच्या अधिक जवळ असतील. खांबांची लांबी दोन मीटर, रुंदी अडीच मीटर आहे. खांबांवर जमिनीपासून सहा ते साडेसहा मीटर अंतरावर ‘पिलर आर्म’ बसविण्यात येतील. 

खांबाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेदहा मीटर अंतराचे पिलर आर्म बसविल्यानंतर त्यावर गर्डर टाकले जातील. गर्डरवर आडवे बीम टाकून पहिला प्लॅटफॉर्म तयार केला जाईल.

 दहाही खांबांना असे पिलर आर्म बसविले जाणार आहेत. पहिल्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मेट्रोचे तिकीट मिळेल. तिकीट खरेदी केल्यानंतर तेथून त्यांना दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवर मेट्रोत बसण्यासाठी जाता येईल. पहिल्या प्लॅटफॉर्मनंतर त्याच पद्धतीने दुसरा व तिसरा प्लॅटफॉर्म बसविला जाईल. 

मेट्रो स्थानकाच्या दोन्ही बाजूला पदपथापर्यंत जाण्यासाठी सोय करण्यात येईल. त्यासाठी तेथे पादचारी उड्डाण पूल असेल. तेथून ये-जा करण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट, तसेच पायऱ्या असतील. चारही बाजूंना ही सुविधा असेल. तेथे वाहनतळही उभारण्यात येईल. त्याची कामे सुरू झाली आहेत. 

पहिल्या प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना वल्लभनगर बसस्थानकातही जाता येईल. येथून जाणाऱ्या बीआरटी मार्गालाही हे जोडले जाणार आहे.

संत तुकारामनगर हे पहिले स्थानक असून, दहा खांब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या व दुसऱ्या खांबांचे पिलर आर्म बसविण्यासाठी मुख्य रस्त्याच्या कडेला आधार उभारले आहेत. 
- गौतम बिऱ्हाडे,  मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महामेट्रो

Web Title: Metro station work fast