मेट्रो स्थानकाचे काम रखडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - स्वारगेट चौकातील पीएमपी स्थानकाच्या स्थलांतराची प्रक्रिया पावसाळ्यानंतरच होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पीएमपीसाठी पर्यायी जागा दोन आठवड्यांत निश्‍चित करू, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे; तर जागा ताब्यात आल्याशिवाय स्थलांतर होणार नाही, अशी भूमिका पीएमपीने घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयावर जेधे चौकातील भुयारी मेट्रो स्थानकाच्या कामाचा वेग अवलंबून असणार आहे. 

पुणे - स्वारगेट चौकातील पीएमपी स्थानकाच्या स्थलांतराची प्रक्रिया पावसाळ्यानंतरच होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पीएमपीसाठी पर्यायी जागा दोन आठवड्यांत निश्‍चित करू, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे; तर जागा ताब्यात आल्याशिवाय स्थलांतर होणार नाही, अशी भूमिका पीएमपीने घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयावर जेधे चौकातील भुयारी मेट्रो स्थानकाच्या कामाचा वेग अवलंबून असणार आहे. 

वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट या मार्गांचे स्वारगेटच्या जेधे चौकात भूमिगत स्थानक होणार आहे. जमिनीखाली पाच आणि वर १० मजल्यांची ही इमारत होणार असून, येथे वाहनतळही होणार आहे. प्रवाशांची वाहने, रिक्षा, कॅब आदींना त्यात सामावून घेतले जाईल. पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गात स्वारगेट-शिवाजीनगर दरम्यानचा मार्ग भूमिगत असेल. त्यासाठीचे बोगदा खणण्याचे काम शिवाजीनगर आणि स्वारगेटपासून सुरू झाले आहे. त्यामुळे स्वारगेटच्या पीएमपी स्थानकाचे स्थलांतर झाल्यावर भुयारी स्थानकाच्या कामाला वेग येऊ शकेल. 

पीएमपीच्या पर्यायी स्थानकासाठी लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील भूखंड निश्‍चित करण्यात आला आहे. तेथील सुमारे अडीच एकर जागा पीएमपीला द्यावी लागेल. महापालिका तेथील जमिनीचे सपाटीकरण करून आणि शेड उभारून पीएमपीच्या ताब्यात देणार आहे. 

ही जागा तातडीने पीएमपीला उपलब्ध करून द्यावी, यासाठी महामेट्रो महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दोन आठवड्यांत जागा पीएमपीला उपलब्ध होईल, असे आश्‍वासन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याची पूर्तता कधी होईल, याकडे महामेट्रो आणि पीएमपीचे लक्ष लागले आहे.

पीएमपीचे स्वारगेट महत्त्वाचे स्थानक आहे. महामेट्रोच्या कामासाठी पीएमपी स्थानकाचे स्थलांतर करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु, पर्यायी जागा विकसित करून तातडीने पीएमपीला मिळाली पाहिजे अन्यथा पीएमपीची वाहतूक विस्कळित होऊन प्रवाशांची गैरसोय होईल. 
- विलास बांदल, महाव्यवस्थापक, पीएमपी

पीएमपीला स्वारगेट येथे पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील जागा दोन आठवड्यांत उपलब्ध होऊन ती विकसित करण्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. 
- रामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो

 स्वारगेट स्थानकावरून जाणाऱ्या बसची संख्या - सुमारे २००
 रोजची प्रवासी वाहतूक - सुमारे ६० हजार 
 बसच्या फेऱ्या - २०००-२५००

Web Title: Metro Station work issue