पिंपरी-चिंचवड भागात मेट्रो डिसेंबरपर्यंत धावणारच

पिंपरी-चिंचवड भागात मेट्रो डिसेंबरपर्यंत धावणारच

पिंपरी - या वर्षअखेरीपर्यंत १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे महामेट्रोने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड भागात दापोडी स्थानकाचे या महिन्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकापासून दापोडीपर्यंत मेट्रो डिसेंबर धावण्यास सुरवात होईल, अशा पद्धतीने कामाला गती दिली आहे.

फुगेवाडी ते होळकर चौकदरम्यान मेट्रो सुरू करण्याला प्राधान्य देण्याचे नियोजन महामेट्रोने पूर्वी केले होते. त्या वेळी महापालिका भवन, संत तुकारामनगर आणि फुगेवाडी ही स्थानके उभारून त्यादरम्यान मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्याचे नियोजन होते. नाशिकफाटा येथील स्थानक तीन मजली असून कासारवाडी येथील स्थानकाचे काम अद्याप सुरू झाले नाही. ही स्थानके बांधण्यास विलंब असल्याने पहिल्या टप्प्यात तिथे मेट्रो न थांबता पुढे मार्गस्थ होणार होती. 

महामेट्रोने पूर्वीच्या प्राधान्यक्रमानुसार दापोडी येथील नियोजित स्थानकापासून व्हायाडक्‍ट (पूल) बांधण्यास सुरवात केली. ते काम आता फुगेवाडी स्थानकापर्यंत आले आहे. दुसऱ्या बाजूला खराळवाडीकडून प्रथम गर्डर लाँचरने सुरू केलेले व्हायाडक्‍टचे काम संत तुकारामनगर स्थानकापर्यंत पोचेल. या दोन स्थानकाचा कॉनकोर्स लेव्हलसाठी (पहिला टप्पा) सर्व खांबांवर दोन्ही बाजूला आर्म्स बसविले. प्लॅटफॉर्म लेव्हलपर्यंतचे खांब उभारून त्यावर कॅप बसविण्यात येत आहेत. ते होताच तेथील व्हायाडक्‍टचे काम सुरू होईल. संत तुकारामनगर स्थानकावरील व्हायाडक्‍टचे काम गेल्या आठवड्यात सुरू झाले.

मेट्रो डिसेंबर २०१९ पर्यंत १२ किलोमीटर धावेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या भूमिपूजनाच्या वेळी पुण्यात केली. त्यावेळी महामेट्रोची तयारी नव्हती. मात्र, पंतप्रधानांनी घोषणा केल्याने त्याची पूर्तता करण्याचे नियोजन त्यांनी केली व त्यासाठी प्राधान्यक्रम बदलला. दापोडी ते महापालिका भवनादरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतर होते. त्यामुळे दापोडी स्थानक तातडीने उभारण्याचा निर्णय घेतला.

दापोडी स्थानकाचे दहा खांब उभारून त्यावर आर्म्स बांधण्यास १३ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. दहापैकी तीन पिलर आर्म्स पूर्ण झाले असून येत्या आठवड्यात आणखी दोन होतील. उर्वरित पाच खांबांवरील काम मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करण्यात येईल. प्लॅटफार्मसाठीचे खांब उभारल्यानंतर त्या स्थानकापासून हॅरिस पुलाच्या दिशेने व्हायाडक्‍टचे काम सुरू होईल. 

महामेट्रोच्या दृष्टीने महापालिका भवनासमोरील व नाशिकफाटा उड्डाणपुलाजवळील काम कठीण आहे. स्थानकाच्या नवव्या खांबाचे काम सध्या सुरू असून ते झाल्यानंतर चौकातच दहाव्या खांबाचे काम सुरू करण्यात येईल. मेट्रो मार्गाच्या या पहिल्या स्थानकाचे खांब उभारणी झाल्यावर मार्चच्या मध्यानंतर तेथील आर्म्स बांधण्यास प्रारंभ होईल. दरम्यान, खराळवाडीपासून महापालिका भवनाच्या दिशेने व्हायाडक्‍टचे कामही मार्चमध्ये सुरू होणार असून त्यासाठी चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत आहे.

पिंपरी-पुणे दोन वर्षे लागणार
संरक्षण विभागाकडून खडकी व रेंजहिल्स भागात मेट्रोच्या कामास अद्याप परवानगी मिळाली नाही. त्या संदर्भातील सामंजस्य कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बोपोडीतील १६ खांबांसाठी काम सुरू झाले. हॅरिस पूल ते रेंजहिल्स येथील मेट्रो आगारापर्यंत सुमारे दीडशे खांब व तीन स्थानके आहेत. त्यामुळे मेट्रोने पिंपरीतून पुण्यात जाण्यास आणखी दोन-तीन वर्षे लागण्याची शक्‍यता आहे.

दापोडी ते महापालिका भवन या दोन स्थानकांदरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतरात मेट्रो प्रथम धावणार असल्याने या स्थानकांच्या उभारणीला प्राधान्य दिले. दरम्यान संत तुकारामनगर व फुगेवाडी स्थानकांची कामेही पूर्ण होतील. नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळील काम तेथील वाहतुकीमुळे आव्हानात्मक आहे. तेथील ३१ पैकी १८ खांबांसाठी पायलिंग झाले असून, त्यापैकी नऊ ठिकाणी पायाचे सिमेंट काँक्रिटिंग पूर्ण झाले आहे.
- गौतम बिऱ्हाडे,  कार्यकारी संचालक, महामेट्रो

मेट्रोची प्रगती 
२७६ - खांबांसाठी फाउंडेशन
२११ - खांब
१३७ - खांबांवरील कॅप 
८८ - व्हायाडक्‍टचे स्पॅन
२२ - स्थानकासाठी आर्म्स 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com