पिंपरीत मेट्रोच्या कामाचा वेग मंदावला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दापोडी ते पिंपरी यादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीत सतत येणाऱ्या विस्कळितपणामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. तसेच, मेट्रो आणि वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. 
मेट्रोच्या कामाला वेगात सुरवात झाली. मात्र, आता वेग मंदावला आहे.

पिंपरी : पिंपरी ते रेंजहिल्स यादरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामाचा वेग मंदावल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. 

दापोडी ते पिंपरी यादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीत सतत येणाऱ्या विस्कळितपणामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. तसेच, मेट्रो आणि वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. 
मेट्रोच्या कामाला वेगात सुरवात झाली. मात्र, आता वेग मंदावला आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोचे काम सुरू असल्याने हा रस्ता अनेकदा वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे दापोडीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्यालगत वाहनांच्या पार्किंगमुळे फुगेवाडी चौक परिसरात कोंडी होते. कासारवाडी परिसरात मेट्रोचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने सेवा रस्त्यावर कायम कोंडी होते. भोसरीकडे जाणारी वाहने सेवा रस्त्याने पुढे जाऊन चौकात वळण्यासाठी थांबतात. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लागतात. या परिसरातील रस्त्याची चाळण झाली असून, त्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागतो. कासारवाडी चौकातून पिंपरीकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. 
पिंपरी पालिकेसमोर काम सुरू असणाऱ्या मोकळ्या जागेचा वापर वाहनचालकांकडून पार्किंगसाठी केला जातो. येथील कामामुळे मोरवाडी चौकात कोंडीत भर पडली आहे. पिंपरी चौकातून जाणाऱ्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

पावसामुळे मेट्रोच्या कामाचा वेग थोडा कमी झाला होता, तो आता पूर्ववत झाला आहे. मेट्रोचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड काढले आहेत. कासारवाडी आणि पिंपरी महापालिका परिसरात सुरू असणारे काम पूर्ण होण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, महामेट्रो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: metro work goining slowly