पावसामुळे मेट्रोचे काम थांबविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे - मुठा नदीच्या पात्रातून शहरातील मेट्रो मार्ग उभारण्याचे सुरू असलेले काम आगामी किमान सात ते दहा दिवस बंद राहणार असल्याचे महामेट्रोकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. या पूर्वी झालेल्या कामावर पावसाचा किंवा नदीपात्रातील पाण्याचा कोणताही परिणाम होणार 
नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे - मुठा नदीच्या पात्रातून शहरातील मेट्रो मार्ग उभारण्याचे सुरू असलेले काम आगामी किमान सात ते दहा दिवस बंद राहणार असल्याचे महामेट्रोकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. या पूर्वी झालेल्या कामावर पावसाचा किंवा नदीपात्रातील पाण्याचा कोणताही परिणाम होणार 
नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

वनाज-रामवाडी मेट्रोचा सुमारे दोन किलोमीटरचा मार्ग मुठा नदीच्या पात्राशेजारील रस्त्यावरून जाणार आहे. नदीपात्राशेजारून मार्गासाठी ४०, तर स्थानकांसाठी सुमारे २० खांब उभारले जाणार आहेत. त्यातील २४ खांबांचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे. तर, सात खांबांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. काही खांबांचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस वाढल्याने सोमवारी सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून महामेट्रोने नदीपात्रातील मेट्रो मार्ग आणि स्थानकांचे काम थांबविले आहे. तसेच, जेसीबी, खोदाईची मशिनरी आणि उपकरणेही संभाजी उद्यानाजवळील गोदामात हलविण्यात आली आहेत. 
याबाबत महामेट्रोचे संबंधित अधिकारी म्हणाले, ‘‘मेट्रो मार्ग आणि स्थानकांचे नदीपात्रातील काम पुढच्या सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. पावसाचा जोर आणि नदीत सोडण्यात येणारे पाणी, याचा आढावा घेऊन काम सुरू कधी करायचे ते ठरविण्यात येईल.’’ 

या पूर्वी झालेल्या कामावर पावसाचा किंवा नदीतील वाढलेल्या पाणीसाठ्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नदीपात्रातील काम बंद झाले असले, तरी वनाज ते शिवाजीनगरदरम्यानच्या मार्गाचे आणि स्थानकांचे काम सुरू राहणार आहे. त्याबाबत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करून काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Metro work stop by rain