एचएच्या जागेबाबत ‘म्हाडा’चा निर्णय नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

पिंपरी - हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीची सव्वासहा एकर जागा म्हाडाने मागितली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पिंपरी - हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीची सव्वासहा एकर जागा म्हाडाने मागितली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

म्हाडाने २०१३ मध्ये एचएची सव्वासहा एकर जागा मागितली होती. एचएची पी आठ आणि पी नऊमध्ये ही सव्वासहा एकर जागा आहे. त्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव अद्याप मान्य झालेला नसल्याने ती म्हाडाला मिळू शकली नाही. गेल्या चार वर्षांपासून या प्रस्तावासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, एचएची ८८ एकर जमिनीची विक्री करण्यास केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सरकारी आस्थापनांना ही जागा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाकडूनही जमीन खरेदीचा प्रस्ताव देण्यात येणार आहे का, यासंदर्भात म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारकडून नुकताच निर्णय जाहीर झाला आहे. त्यासंदर्भातील तपशील अद्याप हाती आला नाही. सर्व माहिती आल्यानंतर त्यासंदर्भात विचार करण्यात येणार आहे. एचएची सव्वासहा एकर जमीन म्हाडाला देण्यासंदर्भात आतापर्यंत एक-दोन वेळा बैठक झाली असली, तरी त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही.’’
केंद्र सरकारने एचएची ८८ एकर जमीन विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये म्हाडाकडून मागणी करण्यात आलेल्या जमिनीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. म्हाडाकडून यासंदर्भात सातत्याने पाठपुरवठा सुरू असला, तरी केंद्राकडून त्याला कधी मान्यता मिळेल, याचे उत्तर आताच्या परिस्थितीला देणे अवघड असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निवासी संकुलाचे नियोजन 
एचएची सव्वासहा एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी उत्तम प्रतीची निवासी संकुले उभी करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. प्रत्यक्षात जमिनीचा ताबा मिळाल्यानंतरच त्याची मोजणी करून नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: mhada dont decission by ha place