लॉटरी फुटली; नशीब उजळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

‘म्हाडा’च्या सोडतीत ३ हजार १३९ जणांना घराचा लाभ
खडकवासला - ‘म्हाडा’ची सोडत सुरू झाल्यानंतर अर्ज भरलेल्या नागरिकांची वाढलेली धडधड... घर मिळालेल्यांच्या चेहऱ्यांवर फुललेले हसू, तर न मिळाल्याने निराश झालेले अनेक जण... ‘शेवटी नशिबाचाच खेळ असतो,’ अशा व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया... असे चित्र म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीप्रसंगी पाहावयास मिळाले.

म्हाडाची पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील सदनिका व भूखंडाची सोडत शनिवारी नांदेड सिटी येथे जाहीर झाली. आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, सचिव भारत बास्टेवाड, उपसचिव रामचंद्र धनावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाने, माजी अध्यक्ष अंकुश काकडे आदी उपस्थित होते. म्हाडाच्या सदनिका आणि भूखंडाच्या सोडतीसाठी एकूण ३६ हजार ९९ अर्ज आले होते. त्यातील ३ हजार १३९ जणांना या सोडतीचा लाभ झाला. तापकीर म्हणाले, ‘‘म्हाडाच्या सोडतीत अर्ज जास्त आले आणि घरांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येकाला घर मिळेल का हे माहीत नाही.

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रत्येकाला घर’ या योजनेची घोषणा केली आहे. त्यात मात्र सगळ्यांना घरे मिळतील.’’ घाटगे म्हणाले, ‘‘घरांबाबतची अधिकची माहिती म्हाडा लॉटरी या संकेतस्थळावर मिळणार आहे.’’ 

म्हाडाचे कर्मचारी असलेले लालजी बडे यांनी विविध घरांच्या सोडतीसाठी अपंग प्रवर्गातून यापूर्वी सात वेळेस अर्ज केले होते. त्यांना आठव्या प्रयत्नात रावेत येथील प्रकल्पात घर मिळाले आहे.

शिवरायांचा आशीर्वाद...
दांडेकर पूल येथील झोपडपट्टीत राहणारे शाहीर श्रीकांत रेणगे यांनाही कलाकार कोट्यातून घर मिळाले आहे. ते म्हणाले, ‘‘कष्ट व पोवड्याची कला सादर करून पुण्यात घर घेण्याचे माझे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ते आता पूर्ण झाले आहे.’’ 

डिसेंबरमध्ये पुन्हा सोडत
डिसेंबर महिन्यात दोन हजार घरांची सोडत होणार आहे. त्यापैकी १४०० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहे. पुणे मंडळाच्या माध्यमातून ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजय लहाने यांनी दिली आहे.

Web Title: mhada home draw