चेहऱ्यावर फुलले घर मिळाल्याचे समाधान (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - स्वत:चे हक्‍काचे घर व्हावे, यासाठी ऑनलाइन अर्ज भरल्यापासून १९ डिसेंबर कधी येणार, याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर तो दिवस उजाडल्यानंतर आज अनेक जण आपल्याला घर मिळाले की नाही, ही यादी पाहण्यात व्यस्त होते. कोणाच्या चेहऱ्यावर घर मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. तर, काहींना यादीत नाव नसल्यामुळे निराशेने परतावे लागले.

पुणे - स्वत:चे हक्‍काचे घर व्हावे, यासाठी ऑनलाइन अर्ज भरल्यापासून १९ डिसेंबर कधी येणार, याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर तो दिवस उजाडल्यानंतर आज अनेक जण आपल्याला घर मिळाले की नाही, ही यादी पाहण्यात व्यस्त होते. कोणाच्या चेहऱ्यावर घर मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. तर, काहींना यादीत नाव नसल्यामुळे निराशेने परतावे लागले.

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) ८१२ घरांसाठी अल्पबचत भवन येथे बुधवारी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या वेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी अशोक पाटील, विभागीय आयुक्‍त कार्यालयातील उपायुक्‍त (पुनर्वसन) दीपक नलावडे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

‘म्हाडा’च्या या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील २४२ आणि पिंपरी-चिंचवडमधील ५७० अशा एकूण ८१२ घरांसाठी सोडत होती. त्यासाठी ३६ हजार ५६८ अर्ज प्राप्त झाले होते. पुण्यात महंमदवाडी, पाषाण, येवलेवाडी, आंबेगाव, तसेच पिंपरीमध्ये वाकड, रहाटणी, चिखली यांसह अन्य ठिकाणी घरे होती. या घरांच्या किमती दहा लाख ९२ हजार रुपये ते १९ लाख ५६ हजार रुपये या दरम्यान आहेत. या घरांसाठी २१ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यात आले होते. सहा डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यात आले. त्यात अनेकांनी पहिल्यांदाच घरासाठी अर्ज केला आणि त्यांना घर मिळाले.

जानेवारीमध्ये पुन्हा सोडत 
‘म्हाडा’च्या सोडतीत ज्यांना स्वप्नातील घर मिळाले, त्यांचे अभिनंदन. मात्र ज्यांना घर मिळाले नाही, अशा लोकांनी आता निराश व्हायची गरज नाही. कारण पुढील महिन्यात अर्थात जानेवारीमध्ये पुणे शहर आणि मंडळामध्ये एकूण तीन हजार ७०० घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये केवळ पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन हजार ६०० घरे उपलब्ध होतील, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा ‘म्हाडा’चा प्रयत्न आहे. नुकतीच काही महिन्यांपूर्वी ३१६८ घरांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर आज ८१२ घरांची सोडत काढली असून, पुन्हा जानेवारीअखेर तीन हजार ७०० घरांसाठी सोडत निघणार आहे. 
- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष म्हाडा, पुणे विभाग
  
सैन्यदलात १७ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्यात राहण्यास आलो; परंतु येथे वर्षभरापासून भाडेतत्त्वावर राहत होतो. म्हाडाच्या यादीत नाव पाहिले. त्यात चिखली येथे स्वत:चे घर मिळाल्याचे पाहून मला आणि माझ्या कुटुंबीयांना आनंद झाला. म्हाडाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही धन्यवाद.
- वाल्मीक झांजे, देहूगाव, (मूळ रा. आष्टी, जि. बीड)

Web Title: Mhada Home Draw