मिडी बसला नादुरुस्तीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या मिडी बसलाही बंद पडण्याचे दुखणे सुरू झाले आहे. सध्या नव्या २२७ मिडी बसपैकी २०० रस्त्यावर असून, २७ बस नादुरुस्त आहेत. मात्र, त्या दुरुस्त करण्यासाठी सुट्या भागांची कमतरता भासत असून, त्यासाठी आता उत्पादक कंपनीचे एक युनिट पीएमपीमध्ये सुरू होणार आहे.

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या मिडी बसलाही बंद पडण्याचे दुखणे सुरू झाले आहे. सध्या नव्या २२७ मिडी बसपैकी २०० रस्त्यावर असून, २७ बस नादुरुस्त आहेत. मात्र, त्या दुरुस्त करण्यासाठी सुट्या भागांची कमतरता भासत असून, त्यासाठी आता उत्पादक कंपनीचे एक युनिट पीएमपीमध्ये सुरू होणार आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वी नऊ मीटर लांबीच्या २०० मिडी बस दाखल झाल्या. पाठोपाठ महिलांसाठी स्पेशल ‘तेजस्विनी’च्या २७ बस दाखल झाल्या आहेत. या सर्व बस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बस नव्या असल्यामुळे त्या लगेचच बंद पडतील, असे प्रशासनाला वाटत नव्हते.

परंतु, शहरात ठिकठिकाणी मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून, ब्रेक, क्‍लचवर ताण येत आहे. त्यातून बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. या बसेस दररोज सुमारे २०० किलोमीटर धावतात. 

नादुरुस्त २७ बसला सुट्या भागांची कमतरता भासत असल्याने पीएमपी प्रशासनाने उत्पादक कंपनीशी नुकतीच चर्चा केली आहे. त्यांनीही पीएमपीच्या मध्यवर्ती कार्यालयात सुटे भाग पुरविण्यासाठी एक युनिट सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.

महिनाअखेरीस हे युनिट कार्यान्वित होईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. या बस बंद पडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सुटे भाग उपलब्ध झाल्यावर बंद पडलेल्या बस तातडीने मार्गावर सोडण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

ई-बस पडताहेत बंद! 
पीएमपीच्या ताफ्यात ९ मार्चला २५ ई- बस दाखल झाल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ब्रेकवर ताण येऊन एक बस नुकतीच बंद पडल्याची घटना घडली. एअर पाइप लिकेज होणे, बॅटरी ड्रेन होणे आदीही प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने उत्पादक कंपनीशी संपर्क साधला आहे. त्यानुसार त्यांचे एक पथक आले व त्यांनी तातडीने बसची दुरुस्ती केली. त्यामुळे सर्व २५ बस आता मार्गावर धावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एखादी बस बंद पडल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्पादक कंपनीने एक जादा बसही पीएमपीला सध्या दिली आहे.

Web Title: Midi Bus Illusion