पाटेकर म्हणजे मराठी सारस्वतांचं खरं ऐश्वर्य - प्रा. मिलिंद जोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे आजच्या मराठी सारस्वतांच खरं ऐश्वर्य आहे, असे गौरवोद्‌गार मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले. 

पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे आजच्या मराठी सारस्वतांच खरं ऐश्वर्य आहे, असे गौरवोद्‌गार मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले. 

ऐश्वर्य पाटेकर लिखित ‘जू’ या आत्मकथनपर कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मराठी साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात शनिवारी (ता. ६) पार पडला. या वेळी ते बोलत होते. सकाळ प्रकाशन व साहित्य परिषदेने आयोजिलेल्या या सोहळ्यात ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, ‘मसाप’ पत्रिकेचे संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे, सौ. सारिका पाटेकर व्यासपीठावर होते. सुदर्शन रंगमंचचे कलावंत सचिन जोशी यांनी ‘जू’ कादंबरीचे अतिशय प्रभावीपणे वाचन केले. 

श्री. जोशी म्हणाले, की ऐश्वर्यने आयुष्याच्या उमेदीच्या वळणावर आत्मकथन लिहिण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. आत्मप्रौढी व आत्मगौरवाच्या एकांगीपणामुळे साहित्यामधील अनेक आत्मकथनांचा अस्त झाला. त्यामुळे‘जू’ हे वेगळे आत्मकथन ठरले आहे. हे आत्मकथन ऐश्वर्यचे, आईचे किंवा भावाबहिणीचेच होत नाही, तर भुकेच्या विविध अवस्थांमध्ये व्याकुळ झालेल्या अवघ्या समूहाचे ते आत्मकथन बनले आहे. 

लेखक श्री. पाटेकर या वेळी म्हणाले, की साहित्याच्या माध्यमातून माणसे जोडण्यासाठीच मी लिहितो आहे. त्यामुळेच मला सुंदर माणसे भेटत गेली.

‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाणदेखील या लेखनातून भेटले. त्यांनी मला लिहिते केले. ‘ॲग्रोवन’मध्ये माझी पहिली मुलाखत प्रसिद्ध होताच राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाचकांनी माझ्याशी संपर्क साधला. काही वाचक ढसढसा रडत असत. मी मग त्यांच्यासाठी अनुभवाची गुंतावळ लिहीत राहिलो. वाचकांच्या प्रेमामुळेच सकाळच्या माध्यमातून ‘जू’ कादंबरीचा जन्म झाला आहे. ‘ॲग्रोवन’चे संपादक श्री. चव्हाण या वेळी म्हणाले, की भुईशास्त्र काव्यसंग्रहाच्या माध्यमातून ऐश्वर्यची प्रतिभा दिसून आली. त्यामुळे ‘ॲग्रोवन’च्या वाचकांसाठी त्यानं लिहावं असा प्रयत्न आम्ही केला. त्याचं लेखन शेतकऱ्यांना रडवणारं, व्याकुळ करणारं होतं. त्यातून तयार झालेले ‘जू’ हे आत्मकथन म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्यामधील ‘झोंबी’नंतरचा दुसरा टप्पा ठरला आहे. आयुष्याची फाटकी गोधडी सत्याच्या माध्यमातून अधिक उसवून दाखविताना ऐश्वर्यने अप्रतिम भाषाशैली वापरली आहे. त्यामुळेच ‘जू’ आत्मकथन मराठी साहित्यामधील एक वेगळा मापदंड बनलं आहे.  ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक आशुतोष रामगिर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

सूत्रसंचालन परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी केले. सकाळच्या प्रकाशन विभागाच्या संपादिका दीपाली चौधरी, व्यंग्यचित्रकार लहू काळे, लेखक श्रीरंजन आवटे, लेखक प्रतीक पुरी व इतर मान्यवर उपस्थित होते. 
सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकांबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क - ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (सकाळी १० ते सायंकाळी ६).

 

Web Title: milind joshi talking