पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

मंगळवार, 30 जून 2020

खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस.....त्यांच्या जीवनातील काही वेगळ्या, लोकांना माहिती नसलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणा-या काही घडामोडींचा घेतलेला हा धावता आढावा......

एखाद्या मोठ्या वलयांकीत घराण्यात जन्माला आलेलो असलो किंवा सतत राजकीय पार्श्वभूमी असली तरी वेगळ काहीतरी करत नवीन शिकण्याची उर्मी असलेल्या सुप्रिया सुळे आहेत. शरद पवार यांची कन्या ही बिरुदावली त्यांच्यामागे कायमच असली तरी गेल्या एक तपाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये त्यांनी स्वताःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुप्रिया सुळे यांचा स्वभाव सतत नवीन काहीतरी शिकण्याचा आहे. ताईंच्या श्रध्देची काही ठिकाणं आहेत.  जेव्हा वेळ मिळतो तेव्हा त्या पवनार येथे जातात. आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर तर आहेच पण पवनारला गौतम बजाज यांच्या सान्निध्यात वेळ व्यतित करणे हा त्यांच्या आवडीचा विषय. जीवन जगताना विनोबा भावे यांच्यासह महात्मा गांधी यांच्या विचारांचा अवलंब व्हावा हाच त्या मागचा उद्देश असतो. 
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
शेगावला ताई जातात ते शिवशंकर भाऊ यांची भेट घेण्यासाठी. त्यांच्या प्रचंड अनुभवाचा फायदा आपल्याला आपल्या नियोजनात व्हावा, त्यांच्या प्रदीर्घ कार्याची जवळून माहिती व्हावी, त्यांच्याशी बोलून नवीन काहीतरी शिकावे हा त्यांचा उद्देश असतो. पवारसाहेबांना जसा शिवशंकरभाऊंविषयी कमालीचा आदर आहे, तितकाच किंबहुना त्याहून अधिक आदर त्यांचा ताई करतात. शिकण्याची एक ही जागा असा भाव या भेटीदरम्यान असतो. कोणत्याही देवस्थानची लोक भेटायला येतात तेव्हा आवर्जून त्या शिवशंकर भाऊ यांच्याशी बोला...असे त्या सांगतात. 

पंढरपूरच्या पांडुरंगाप्रती ताईंची प्रचंड श्रध्दा आहे. संध्याकाळी कार्यक्रम उरकून पंढरपूरच्या दिशेने कूच करायचे, मोजक्याच लोकांना याची कल्पना द्यायची, काही तासांची विश्रांती घेत पहाटेच्या काकडआरतीला हजेरी लावायची व सकाळी नऊ वाजता मतदारसंघातील कार्यक्रमाला हजेरी लावायची, असे त्यांनी अनेकदा केले आहे. अनेकांना ताई पंढरपूरला येऊन गेलेल्याही माहिती नसायचे. जीवनात आलेल्या अनेक प्रसंगातून तावुन सुलाखून निघताना पांडुरंगाचा आशिर्वाद पाठीशी कायमच आहे, ही त्यांची श्रध्दा आहे. जीवनातील कठीण प्रसंगात सर्वाधिक आधार वाटतो तो पांडुरंगाचा ही त्यांची भावना असते. 

कष्ट करण्याची प्रचंड ताकद हे पवार कुटुंबियांचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. स्वताः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सगळेच कष्टाला कधीच न कंटाळणारे असेच राजकीय नेते आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबाबतीतही त्या या श्रध्देच्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी जातात तेव्हा त्यांना वेळेचे भान नसते इतक्या त्या यात रममाण होतात. लवाजमा न बाळगता साधेपणाने या सगळ्या गोष्टी करण्यातही त्यांचे वेगळेपण जाणवते. 

अनेक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांना विशेष रस असतो. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, वाढदिवस किंवा घरातला काही कार्यक्रम असेल तर त्या सूत्रे हातात घेऊन नेटके नियोजन करतात. दिलीप वळसे पाटील यांची एकसष्टी असो किंवा शरद पवार यांचा दिल्लीतील पंच्याहत्तरीचा कार्यक्रम असो, एखाद्या इव्हेंट मॅनेजमेट कंपनीला लाजवेल असे उत्तम नियोजन हाही त्यांच्या आवडीचा विषय. त्यातही खाण्याच्या नियोजनात तर त्यांचा हात कोणी धरु शकत नाही. अनेकांना माहितीही नसते पण जेव्हा त्यांच्या कार्यक्रमातील भोजनाचा आस्वाद पाहुणे घेतात, तेव्हा ती चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळते. अर्थात यात मटण सोलापूरहून, वांग्यांच भरीत जळगावहून, थालीपीठ व पुरणपोळ्या करणारे वर्ध्याहून येतात, मासवड्या संगमनेरच्या महिलांकडून, पापलेट व मासे येतात पालघरच्या कोळी बांधवांकडून येतात. वसंत डावखरे यांनी ही व्यवस्था लावून दिलेली. बाबाजान दुर्राणी यांच्या कडील बिर्याणी बनविणारा खानसामा असतो, औरंगाबादहुन हुरडा, चटणी व इतर पदार्थ येतात तर नाशिकच्या एका मिसळवाल्याही यात संधी दिली जाते. या सारखे अनेक लोक विविध ठिकाणांहून येतात. अगोदर याची रंगीत तालिम होते, चव चाखली जाते, त्याला मान्यता मिळाल्यानंतरच मग पाहुण्यांना हे विविध पदार्थ दिले जातात. संसदेत जितक्या तडफेने त्या एखादा विषय मांडतात तितक्याच बारकाईने जेवणाला ज्यांना बोलावले आहे त्यांना चविष्ट पदार्थ कसे खायला घालता येतील याकडे ताईंचे बारकाईने लक्ष असते. 

समाजातील विविध घटकांविषयी त्यांना कमालीची आस्था आहे. शालेय विद्यार्थींनीना सायकल वाटप असो किंवा कर्णदोष असलेल्यांना श्रवणयंत्रे वाटप, वयोश्रीअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अवयव व पूरक साहित्य वाटप असो त्यांचे संवेदनशील मन प्रत्येक ठिकाणी जाणवते. प्रत्येक घटकाला आपली मदत व्हायला हवी, जास्तीत जास्त त्यांना कसे देता येईल याची सतत धडपड त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. 

जे काही करायचे ते अभ्यास व नियोजन करुनच करायचे हा त्यांचा कटाक्ष आहे. कार्यक्रम करतानाही तो किती वेळाचा असला पाहिजे, कोणाची भाषणे किती वेळाची असावीत इथपासून ते इतर रुपरेषा त्या बारकाईने आखतात. कार्यक्रम करतानाही दीपप्रज्वलन किंवा इतर औपचारिकता मुख्य कार्यक्रमाअगोदरच उरकून घ्याव्यात, जेणेकरुन ज्यांना ऐकायला लोक येतात त्यांना बोलण्यासाठी अधिकचा वेळ मिळावा हा त्यांचा आग्रह असतो. जेथे त्यांच्या हातात कार्यक्रम असतो तिथे पुष्पगुच्छाची परंपरा दूर सारत त्यांनी पुस्तकांची परंपरा सुरु केली. यशवंतराव चव्हाण यांची तसेच नवीन काहीतरी घडणारे व त्याचे प्रतिबिंब असलेली पुस्तके आणून ती द्यावीत हा त्यांचा अट्टाहास असतो. पुस्तके कोणती आणली जातात हे त्या स्वताः पाहतात. प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग व्हायला हवा असा प्रयत्न त्या करतात. 

जागर या उपक्रमापासून ख-या अर्थाने त्यांच्या सामाजिक कारकिर्दीस प्रारंभ झाला, त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेकांना साधी राहणी व उच्च विचारसरणीचा अवलंब करण्याचा मूलमंत्र आपल्या कार्यप्रणालीतून देण्याचा प्रयत्न केला. अनेक जणांनी त्यांच्यासमवेत काम करताना यागोष्टी अनुभवल्या नव्याने शिकल्या. 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांशी संपर्क ठेवत लोकांना आपलस करुन घेत सार्वजनिक हिताची कामे वेगाने मार्गी लावून घेण्याचा वारसा सुप्रियाताईंकडे शरद पवार यांच्याकडून आला पण हे करताना  मात्र सुप्रियाताई यांची वेगळी स्टाईल आहे. मित्रत्वाच्या नात्याने समोरच्याला आपलस करुन घेताना त्या सहजतेने कायमस्वरुपी आपली छाप समोरच्या व्यक्तीवर टाकून जातात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तम चित्रकार आहेत. सुप्रिया सुळे व त्यांच्या मैत्रीच नात इतक घट्ट आहे की ममता दीदींनी ताईंसाठी खास चित्रे काढून दिली आहेत, ती त्यांनी आपल्या मुंबईच्या कार्यालयात लावलेली आहेत. ममता बॅनर्जी या रवींद्र संगीत उत्तम गातात व जाणकार आहेत. या विषयावर या दोघींच्या छान गप्पा होतात. अनुराग ठाकूर असतील किंवा प्रकाश जावडेकर असतील नितीन गडकरी असतील किंवा अगदी लालुप्रसाद यादव यासह सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी सुप्रिया सुळे यांची उत्तम मैत्री आहेत. राजकारणापलिकडे जात वेगळ नात, हलकीफुलकी मैत्री आणि ती करताना वयोगटाचेही बंधन नाही, असे ऋणानुबंध त्यांनी निर्माण केले आहेत. वैचारिक मतभेद बाजूला सारत लोकसभेत सर्वच राजकीय पक्षांच्या खासदारांशी त्यांचे उत्तम संबंध निर्माण झाले आहेत. वयोगटानुसार प्रत्येकाशी त्यांच्या नात्याची वीण तितकीच घट्ट आहे. 

शरद पवार यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त दिल्लीत जो कार्यक्रम आयोजित केला गेला, त्याचे सर्व श्रेय अर्थातच सुप्रियाताई यांचेच होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करत राजकारणापलिकडेही मित्रत्वाचे नाते असते आणि राजकारणविरहीत मैत्री होऊन ती प्रदीर्घ काळ टिकू शकते याचे प्रत्यंतर या कार्यक्रमाने देशाला आले. एरवी परस्परांवर चिखलफेक करणारे सगळेच राष्ट्रीय नेते या व्यासपीठावर शरद पवारांविषयी भरभरुन बोलले आणि अविस्मरणीय असाच हा कार्यक्रम झाला तो ताईंच्या नेटक्या नियोजनामुळे. हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने व कमालीच्या मृदू भाषेत आपला मुद्दा पटवून देण्याच्या त्यांच्या सवयीने दिल्लीकरांवरही त्यांची छाप पडली. 

शरद पवारांच्या विचारांचा वारसा घेऊन मार्गक्रमण करताना सुप्रियाताईंनी आपली वेगळी शैली विकसीत केली, खरतर अशा पध्दतीने राजकारण होऊ शकते व कामे मार्गी लागू शकतात ही बाब नवीन होती, पण हेही शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिले. राजकीय कारकिर्दीचे एक तप पूर्ण करताना अनेक वळणांवर त्यांनाही खाचखळग्यांना सामोरे जावे लागले, मात्र खचून न जाता हिंमतीने त्या मार्गक्रमण करत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडण्याचा जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य मिळो हिच प्रार्थना.