नागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

चंद्रकांत घोडेकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल राहुल बडोला यांच्या मार्गदर्शनाखाली हे पार पडले.

या शिबिरात 28 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना 1600 मीटर धावणे, लांब उडी, पुलअप व इतर मैदानी कसरती, देशभक्तिपर प्रेरणात्मक चित्रपट, युद्धात वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची तांत्रिक माहिती, सैन्य भरतीबाबत चाचणी, सैन्य भरतीसाठी आवश्‍यक कागदपत्रे तपासणी, लेखी परीक्षा अभ्यासक्रम व स्वरूप, अभ्यासासाठी महत्त्वाची पुस्तके याबाबत हवालदार अशोक कुमार व हवालदार पी. सुबुद्धी यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष संदीप साबळे यांनी भेट देऊन आदिवासी मुलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. हे शिबिर सैन्य व पोलिस भरतीसाठी खूप लाभदायक ठरणार आहे; तसेच प्रथमच सैन्य भरतीसाठी सैनिकी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली असल्याचे मत शिबिरानंतर प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले.

गुन्हेगारी विश्वातून बाहेर काढण्यासाठी या केंद्रात सातारा व पुणे जिल्ह्यातील पारधी समाजाच्या पकडलेल्या गुन्हेगारांची मुले व परिस्थितीने गरीब असलेल्या मुलांना सहभागी करण्यात आले होते. त्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची मदत घेऊन अशा गुन्हेगारांची यादी काढण्यात आली. त्यांची मुले शोधून त्यांना प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. या प्रशिक्षणामुळे सैन्य व पोलिस भरतीमध्ये निश्‍चित फायदा होईल, ही मुले गुन्हेगारी विश्वातून मुख्य प्रवाहित येतील, असे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Web Title: Military police recruitment training for students of Nagapur center