पिंपरीत दोन लाख लिटर दुधाचा दररोज तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरस्थितीमुळे शहरातील म्हशीच्या दुधाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे दररोज सुमारे साडेतीन लाख लिटर असणारा पुरवठा दीड लाख लिटरपर्यंत घसरला आहे. 

पिंपरी : कोल्हापूर आणि सांगली येथील पूरस्थितीमुळे शहरातील म्हशीच्या दुधाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे दररोज सुमारे साडेतीन लाख लिटर असणारा पुरवठा दीड लाख लिटरपर्यंत घसरला आहे. 

या जिल्ह्यांतील दोन मोठ्या ब्रॅंडसह तेथील अन्य स्थानिक ब्रॅंडचे मिळून सुमारे साडेतीन लाख लिटर म्हशीचे दूध शहरात दररोज विक्रीसाठी येते. मात्र, पूरस्थितीमुळे दोन दिवसांपासून दूध पुरवठ्यात लक्षणीय घट झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. त्याशिवाय मिठाई बनविणारे, केटरिंग, हॉटेल व्यावसायिक यांनाही याचा फटका बसला आहे. 
शहरात गायीच्या दुधाची किती आवक होते, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, म्हशीच्या दुधाच्या तुटवड्यामुळे गायीच्या दुधाला मागणी वाढल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. त्यामध्ये स्थानिक पातळीवर दूध उत्पादन करणाऱ्या विक्रेत्यांकडील दुधाला मागणी वाढली आहे. मात्र, या दुधाच्या पुरवठ्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मागणीइतके दूध उपलब्ध होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी अनेकजण दुधाची पावडर घेण्यास प्राधान्य देत आहेत. काही कंपन्यांनी सहा महिन्यांपर्यंत टिकू शकेल, असे दूध बाजारात आणले आहे. या दुधालाही मागणी वाढू लागली आहे. जोपर्यंत पूरग्रस्त जिल्ह्यांमधील स्थिती पूर्वपदाला येत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत फारसा पडेल, असे वाटत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

म्हशीच्या दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे गुजरातमधील एका नामांकित कंपनीकडून म्हशीच्या दुधाचा पुरवठा वाढविण्यात आला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. सायंकाळी अनेक ठिकाणी दूध मिळेनासे झाले आहे. 
- राजू चिंचवडे, अध्यक्ष, घाऊक दूध विक्रेता संघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk shortage in pcmc due to flood in kolhapur, sangali