पुरामुळे शहरात दुधाचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पुणे शहराला दररोज होणारा ‘गोकुळ’चा पावणेतीन लाख लिटर दुधाचा पुरवठा मागील तीन दिवसांपासून थांबला आहे.

पुणे - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पुणे शहराला दररोज होणारा ‘गोकुळ’चा पावणेतीन लाख लिटर दुधाचा पुरवठा मागील तीन दिवसांपासून थांबला आहे. यामुळे शहरात ‘गोकुळ’चे दूध मिळेनासे झाले आहे. परिणामी, कात्रज डेअरी आणि खासगी उत्पादकांच्या दूध विक्रीत वाढ झाली आहे. एकट्या कात्रज डेअरीच्या दुधाची विक्री गुरुवारी (ता. ८) ५० हजार लिटरने वाढली.

‘चितळे’ आणि ‘वारणा’ या दूध उत्पादकांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. ‘वारणा’चे केवळ २० हजार लिटर दूध पुण्यात येते. सध्या पुण्याला हा पुरवठा मुंबईहून केला जात आहे. 

पूरस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून मुंबईत दूध येऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी दहा लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली.  त्यामुळे पूर परिस्थितीमुळे ‘वारणा’च्या पुरवठ्यावर काहीही परिणाम झालेला नसल्याचे ‘वारणा’ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.  

पुण्याला दररोज पावणेतीन लाख लिटर ‘गोकुळ’ दुधाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु, कोल्हापूर शहर व जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूरस्थितीमुळे रस्ते बंद झाले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आणि रस्ते सुरळीत चालू होईपर्यंत हा पुरवठा बंद राहील, असे ‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक दत्तात्रेय घाणेकर यांनी सांगितले. दरम्यान, ‘ऊर्जा’सह अन्य काही खासगी दूध उत्पादकांच्या दूध विक्रीतही वाढ झाली आहे. ‘ऊर्जा’च्या विक्रीत २ हजार लिटरची भर पडली असली, तरी शहरात दुधाचा तुटवडा नसल्याचे या दूध संघाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

‘कात्रज’चे २४ तास पॅकेजिंग
‘गोकुळ’ दुधाचा तुटवडा भरून काढता यावा आणि पुणेकरांना दूध मिळावे, या उद्देशाने कात्रज डेअरीने अन्य दूध संस्थांचा दूधपुरवठा थांबविला आहे. 

पुरामुळे पुणे शहरात ‘चितळे’ दुधाच्या पुरवठ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. नेहमीप्रमाणे दूधपुरवठा सुरळीत सुरू आहे. दूधसंकलनात घट झाली असली, तरी अन्य उत्पादने कमी करून ग्राहकांना दूधपुरवठा केला जात आहे.
- गिरीश चितळे, संचालक, चितळे दूध

दूधपुरवठ्याची स्थिती
  पुणे शहरातील दररोजचा दूधपुरवठा    १५ लाख 
  चितळे दुधाचा एकूण पुरवठा     ५ लाख 
  कात्रज दुधाची प्रतिदिन विक्री    १.५ लाख 
  ‘गोकुळ’चा प्रतिदिन दूधपुरवठा    २.७५ लाख 
  सोनई दुधाची दररोजची विक्री     ४ लाख 
  ‘वारणा’कडून होणारा पुरवठा     २० हजार 
  अन्य उत्पादकांकडून शहरात रोज येणारे दूध    १.५५ लाख 
(आकडे लिटरमध्ये)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk shortages in the city due to floods