#MilkAgitation संकलनाअभावी पुण्यात दुधाचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दूध संकलित झाले नाही. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या (ता. 19) चितळेसह अन्य दूध उत्पादकांचे दूध वितरण विस्कळित होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दूध संकलित झाले नाही. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या (ता. 19) चितळेसह अन्य दूध उत्पादकांचे दूध वितरण विस्कळित होण्याची शक्‍यता आहे.

यासंदर्भात पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, ""आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संकलन केंद्रावर दूध दिले नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची एकूण दुधाची गरज 15 लाख लिटर इतकी आहे. परंतु, आमच्याकडे बुधवारी केवळ एक लाख लिटर दूध संकलित झाले. त्यामुळे तुटवडा निर्माण होणार आहे.''

चितळेचे दूध वितरण आज बंद
भिलवडी येथील डेअरीसह अन्य जिल्ह्यांतील दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांनी बुधवारी दूध टाकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 19) चितळे दूध शहरात वितरित केले जाणार नसल्याचे "चितळे दूध'चे कार्यकारी संचालक श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले.

पोलिसांकडून संरक्षण
दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांकडून दूध पुरवठा करणाऱ्या दूध टॅंकर, टेम्पोची तोडफोड करण्याबरोबरच दूध रस्त्यावर फेकून देण्याचे दोन प्रकार शहरात घडले. असे प्रकार घडू नयेत, यासाठी पुणे पोलिसांकडून दूध टॅंकर, टेम्पोला पोलिस संरक्षण पुरविले जात आहे. संबंधित पोलिस ठाणे आपल्या हद्दीतून दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीपर्यंत वाहने पोचवित आहेत. सोलापूर टोल नाक्‍यावरून येणारे 8 ते 10 दूध टॅंकर, टेम्पो एकत्रित आल्यानंतर त्यांना कोंढवा, हांडेवाडी, वानवडी, येरवड्यापर्यंत पोचविण्याचे काम आमचे पोलिस कर्मचारी करत आहेत. त्यानंतर पुढील पोलिस ठाण्याचे पोलिस त्यांना पुढे जाण्यासाठी संरक्षण पुरवित आहेत, असे हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.
Web Title: #MilkAgitation milk shortage