#MilkAgitation सरकार लय मुजोर हाय.. दूध काय शिजत नाय... (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 19 जुलै 2018

भवानीनगर (पुणे): सरकार लय मुजोर हाय.. दूध काय शिजत नाय...अशा घोषणा देत सणसरच्या कुरवली चौकात आज (गुरुवार) बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळून देखील दुध अखेर शिजलेच नाही, त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले.

भवानीनगर (पुणे): सरकार लय मुजोर हाय.. दूध काय शिजत नाय...अशा घोषणा देत सणसरच्या कुरवली चौकात आज (गुरुवार) बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळून देखील दुध अखेर शिजलेच नाही, त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले.

सणसर येथे रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते व शिवसेनेच्या युवासेनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली. येथील कुरवली चौकात आज सकाळी तीन बांबू बांधून त्याला दुधाने भरलेले मडके बांधण्यात आले. जवळपास दहा ते चौदा फूट उंचावर बांधलेल्या या मडक्यातले दूध सरकारी अध्यादेशांच्या प्रती पेटवून, त्याचा जाळ करून तापवायचे होते. मात्र, या दोन्हीमध्ये खूप मोठे अंतर असल्याने अपेक्षेप्रमाणे दूध काही तापले नाही. परिणामी संतापलेल्या दूध उत्पादक व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून दिले. सरकारी आदेश होतात, मात्र त्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे दूध दरवाढीबाबत शासन जे आंदोलनकर्त्यांची जिरविण्याच्या उद्देशाने दुर्लक्ष करीत आहे, त्याचा निषेध म्हणून सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आंदोलनात शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, संजय सोनवणे, राजेंद्र जामदार, विष्णूपंत कदम, सेनेचे राहूल जगताप, विजय गायकवाड, अजय सोनवणे, राष्ट्रवादीचे पार्थ निंबाळकर, काँग्रेसचे आबासाहेब निंबाळकर आदींसह इतरही सहभागी होते.
 
पांडूरंग रायते म्हणाले, '2017 मध्ये शासनाने 27 रुपये प्रतिलिटरची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात भाव मिळतच नाही, तरीही सरकार कारवाई करीत नाही. सरकारने केलेल्या या दुर्लक्षामुळे राज्यात रोज शेतकऱ्यांची 18 कोटींची लूट होते. आदेश काढल्यापासून आजपर्यंत 7 हजार 200 कोटींची लूट झालेली आहे. याबाबत अजूनही सरकार दुर्लक्षच करीत आहे. सरकार आणि सत्तेतले विरोधक हे मावसभाऊच आहेत.'

Web Title: MilkAgitation Prohibition of government policy in bhawaninagar