विधान परिषदेचे उमेदवार कोट्यधीश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - विधान परिषदेसाठी रिंगणात असलेले चारही पक्षाचे व बंडखोर उमेदवार हे कोट्यधीश आहेत. त्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत कॉंग्रेसचे संजय जगताप असून, त्यांच्याकडे 75 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल भोसले यांच्याकडे 67 कोटी 21 लाख रुपयांची मालमत्ता आहे. 

पुणे - विधान परिषदेसाठी रिंगणात असलेले चारही पक्षाचे व बंडखोर उमेदवार हे कोट्यधीश आहेत. त्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत कॉंग्रेसचे संजय जगताप असून, त्यांच्याकडे 75 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल भोसले यांच्याकडे 67 कोटी 21 लाख रुपयांची मालमत्ता आहे. 

त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांच्याकडे 23 कोटी 70 लाख रुपयांची मालमत्ता आहे. भाजपचे अशोक येनपुरे यांच्याकडे 4 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर शिवसेनेचे माउली खंडागळे यांच्याकडे 1 कोटी 78 लाख रुपयांची मालमत्ता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांनी मालमत्ताविषयक दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार जगताप यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 75 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी राजवर्धिनी यांच्याकडे 3 कोटी 29 लाख रुपयांची मालमत्ता आहे. जगताप यांच्याकडे रोकड 22 लाख 50 हजार 300 रुपये आहेत, तर पत्नीकडे 5 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. जगताप यांच्याकडे 17 तोळे सोने, तर पत्नी राजवर्धिनी यांच्याकडे 65 तोळे सोने, डायमंड आणि 10 किलो चांदी आहे. जगताप यांच्याकडे 10 चारचाकी गाड्या असून, पत्नीकडे एक चारचाकी आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल भोसले यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 67 कोटी 21 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पत्नी रेश्‍मा यांच्याकडे 6 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे. अनिल भोसले यांच्याकडे चारचाकी चार गाड्या आहेत. भोसले यांच्याकडे रोख रक्कम 18 लाख 32 हजार असून, पत्नीकडे 9 लाख 67 लाख रुपये रोख रक्कम आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांच्याकडे 4 कोटी 98 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 18 कोटी 72 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून 23 कोटी 70 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पत्नी मोहिनी यांच्याकडे 6 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता आहे. लांडे यांच्याकडे 24 लाख रुपयांचे सोने असून, पत्नीकडे 6 लाख रुपयांचे सोने आहे. भाजपचे अशोक येनपुरे यांच्याकडे 4 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये स्थावर 2 कोटी 97 लाख रुपयांची, तर 1 कोटी 53 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पत्नी संगीता यांच्याकडे 1 लाख 81 हजार रुपयांची मालमत्ता आहे. येनपुरे यांच्याकडे 12 तोळे सोने आहे. शिवसेनेचे उमेदवार माउली खंडागळे यांच्याकडे 1 कोटी 38 लाख रुपयांची जंगम मालमत्ता, तर 40 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी जयश्री यांच्याकडे 76 लाख 16 हजार रुपयांची मालमत्ता आहे. खंडागळे यांच्याकडे 50 ग्रॅम सोने, तर पत्नीकडे 100 ग्रॅम सोने आहे. 

अपक्ष उमेदवार केदार ऊर्फ गणेश गायकवाड यांच्याकडे 6 कोटी 84 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. गायकवाड यांच्याकडे चारचाकी चार गाड्या असून, यामध्ये मर्सिडीज, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, स्वीफ्ट या गाड्यांचा समावेश आहे, तर 18 लाख 22 हजार रुपयांचे सोने आहे.

Web Title: Millionaire candidates of Legislative Council