शिष्यवृत्तीपासून लाखो विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुण्यात १२८ जणांना लाभ 
राज्यभरातून अनुसूचित जातीसह इतर प्रवर्गातील ५ लाख ७१ हजार ३२४ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ १ हजार २४३ जणांची शिष्यवृत्ती जमा झाली आहे. पुणे जिल्ह्यातून ५८ हजार जणांपैकी १२८ जणांना लाभ झाला आहे, असे जैन यांनी सांगितले.

पुणे - अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले आहे; परंतु समाजकल्याण विभागाने राज्यभरातील अनुसूचित जातीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यात जमा केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बॅंक खात्यात ३१ डिसेंबरपर्यंत पैसे जमा करावेत, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने केली. 

समाजकल्याण विभागातर्फे आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन ते समाजकल्याण विभागाकडे सादर केले जातात. त्यानंतर संस्थेला निधी सुपूर्त केल्यानंतर तेथून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. २०१७-१८ मध्ये तीन लाख ७६ हजार ९९१ विद्यार्थ्यांना १ हजार १०८ कोटींच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले; तर ३८ हजार ९६९ विद्यार्थ्यांची ९३ कोटींची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. 

२०१८-१९ या वर्षासाठी जून-जुलैमध्ये नवीन प्रवेश झाल्यानंतर ३ लाख ६७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. छाननीनंतर काही अर्ज बाद झाले. योग्य अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविले. मात्र, त्यापैकी कोणालाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त माधव वैद्य म्हणाले, की संकेतस्थळ व्यवस्थित नसल्याने पैसे जमा करण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसा जमा करावेत, अशी मागणी एसएसयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of students deprived of scholarships