अखेर निराधार दीपकला ‘आधार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी - मतिमंद दीपक याला अखेर साताऱ्यातील ‘एहसास’ मतिमंद मुलांच्या बालगृहाचा आधार मिळाला आहे. बाल कल्याण समिती, शिवाजीनगरच्या आदेशानुसार पिंपरीतील ‘रीअल लाईफ रीअल पिपल’च्या सहकार्याने त्याला मंगळवारी बालगृहात दाखल करण्यात आले. 

पिंपरी - मतिमंद दीपक याला अखेर साताऱ्यातील ‘एहसास’ मतिमंद मुलांच्या बालगृहाचा आधार मिळाला आहे. बाल कल्याण समिती, शिवाजीनगरच्या आदेशानुसार पिंपरीतील ‘रीअल लाईफ रीअल पिपल’च्या सहकार्याने त्याला मंगळवारी बालगृहात दाखल करण्यात आले. 

वडिलांना मद्याचे व्यसन तर आईचा पत्ता नाही, अशा दुर्दैवी परिस्थितीत बेशुद्धावस्थेत दीपक भगवान वेळसे (वय ९) याला काळेवाडी पोलिसांनी ८ नोव्हेंबरला ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचार केल्यानंतर १७ नोव्हेंबरला घरी जाण्यास परवानगी दिली. परंतु, आई-वडिलांनी स्वीकारले नाही. नातेवाइकही मिळून आले नाहीत. त्याच्या पुनर्वसनाच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, ‘वायसीएम’मधील ‘रीअल लाईफ रीअल पिपल’ या स्वयंसेवी संस्थेचे व्यवस्थापक एम. ए. हुसैन यांनी त्याची देखभाल केली. हुसेन आणि रुग्णालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे यांच्याकडून दीपक याच्या पुनर्वसनाचे सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.     

हुसेन म्हणाले, ‘‘सोमवारी (ता. १०) पुण्यात बाल कल्याण समिती, शिवाजीनगर येथे आम्ही दीपक याला नेले. तेथून समितीच्या आदेशानुसार, सातारा जिल्ह्यातील बाल कल्याण समितीसमोर नेऊन आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. त्या समितीच्या मनीषा वर्गे, सदस्य ॲड. सुधीर गोवेकर, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे यांच्या निर्देशानुसार, त्याला तेथील ‘एहसास’ मतिमंद मुलांच्या बालगृहात रात्री ८ वाजता दाखल केले. वाकड पोलिसांना त्याबाबत पुढील कार्यवाहीच्यादृष्टीने आम्ही कळविणार असून तसे पत्रही देणार आहोत.’’ 

दीपकच्या पुनर्वसनासाठी ‘वायसीएम’चे प्रमुख तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर यादव, बालरोगतज्ज्ञ डॉ. शाम कुंवर आदींचे बहुमोल सहकार्य मिळाले.

बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार, सातारा जिल्ह्यातील ‘एहसास’ संस्थेमध्ये दीपक याला पाठविले आहे. दीपक याला त्याचे स्वतःचे घर मिळावे हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे, त्याच्या आई-वडिलांनी दीपक याला संभाळण्यास समर्थ असल्याचे सिद्ध करून दाखविल्यास त्याला त्यांच्यासमवेत पाठविता येऊ शकेल.
-अश्‍विनी कांबळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, पुणे. 

Web Title: Minded Deepak Velase Support