दीडपट हमीभावाचा फायदा अशक्‍य - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

वालचंदनगर - ‘‘केंद्र सरकारने खरीप हंगामातील पिकांसाठी खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे वडील दत्तात्रेय पाटील (वय ८७) यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या बोरी (ता. इंदापूर) येथील घरी जाऊन कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

पवार यांनी सांगितले, की गतवर्षी मक्‍यासाठी १४०० रुपयांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात अकराशे ते बाराशे रुपयेच पडले. व्यापाऱ्यांनी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने मका खरेदी केली. सरकार खरेदी केंद्रांची संख्या वाढवत नसल्याने अडचणी निर्माण होतात. सरकारने गतवर्षी खरेदी केलेली ५० टक्के तूर शिल्लक असून, खरेदी केलेल्या तुरीचे चार महिन्यांनंतर पैसे दिले होते. यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार  नाही. 

दरम्यान, ता. १६ जुलैपासून राज्यात दूध आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मात्र आमचा रस्त्यावर दूध ओतण्यास विरोध असून, शेतकऱ्यांनी आंदोलन काळात दुधाचे गोरगरिबांना मोफत वाटप करावे. मुंबईत दुधाचे सर्वांत जास्त विक्री होते. बंद काळात मुंबईत गुजरातसह इतर राज्यांतून दूध येण्यास सुरवात होईल. गुजरातमधील दुधाचा दर कमी असल्याने बाजारपेठेवर परिणाम होऊन राज्यातील शेतकऱ्यांचा व दूध संघाचा तोटा होण्याची शक्‍यता आहे. साखरेचे भाव सतत कमी होत असल्याने कारखान्यांना ‘एफआरपी’ देणे शक्‍य होत नाही, असे पवार म्हणाले. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाईचे दशरथ माने, प्रतापराव पाटील, प्रशांत काटे, अमोल पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, सचिन सपकळ, सरपंच संदीप शिंदे, भारत शिंदे उपस्थित होते.

Web Title: minimum support price farmers will not be benefited