मंत्र्यांकडून ९० हजार कोटींचा गैरव्यवहार - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

राजगुरुनगर - भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील १६ मंत्र्यांनी एकूण ९० हजार कोटींचा गैरव्यवहार वेगवेगळ्या प्रकरणांत केला आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

राजगुरुनगर - भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील १६ मंत्र्यांनी एकूण ९० हजार कोटींचा गैरव्यवहार वेगवेगळ्या प्रकरणांत केला आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सभा राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड बाजार समितीच्या आवारात झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, ॲड. राम कांडगे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, जालिंदर कामठे, कैलास सांडभोर, देवेंद्र बुट्टे पाटील, निर्मला पानसरे, शरद मुऱ्हे आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ‘‘भूलथापा देऊन निवडून आलेल्या या लोकांना राज्य कारभार करता येत नाही. शिवसेना-भाजप एकाच माळेचे मणी आहेत. सर्व गोष्टीत हे, ‘अभ्यास करून सांगतो,’ म्हणतात. प्रशासनावर यांची पकड नाही. समाजातले सर्व घटक यांच्यावर नाराज असून, हे शेतकरीविरोधी सरकार आहे. यांनी कामगारविरोधी कायदे केले. राज्यात २७ हजार बालकांचा मृत्यू पोषण आहार न मिळाल्याने झाला. नीरव मोदी प्रकरण झाकण्याकरिता श्रीदेवीच्या मृत्यूचा फायदा घेऊन मीडियाद्वारे तब्बल पाच दिवस तिच्या मृत्यूची बातमी चालविली.’’

‘‘यांच्या सरकारातल्या १६ मंत्र्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांत ९० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्यांनी आणि लॅंडमाफियांनी एकत्र येऊन हजारो एकर जमिनीवरील ‘एमआयडीसी’चे शिक्के काढले असून, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. चिक्की, आदिवासी मागासवर्गीय महामंडळ, डिग्री घोटाळ्यांपासून मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या प्रकरणापर्यंत घोटाळे केले. संभाजीराव निलंगेकरांना ५२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. मंत्रालयाचे साधारण २०० दिवस कामकाज चालते. त्या काळात यांनी साडेतीन कोटींचा चहा लोकांना पाजला असेल; तर रोज २० हजार लोकांनी चहा पिला पाहिजे. पण, येथे कुणी फिरकत नाही. जे येतात, ते आत्महत्या करायला येतात. त्यांच्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावल्या, पण राज्यभरात कुठे कुठे जाळ्या लावणार? सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या या सरकारच्या काळात झाल्या,’’ अशी टीका अजित पवार यांनी केली.   

दिलीप मोहिते म्हणाले, ‘‘खेड तालुक्‍याचे पाणी पुणे आणि शिरूरने पळविले असून, मोटारींचे वीजजोड तोडल्याने खेडचे शेतकरी फक्त पाण्याकडे बघत बसले आहेत. दौंड, शिरूरला पाणी देण्यासाठी आतातर खेडच्या १०० धरणग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत मजल गेली आहे.’’   

सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास लिंभोरे यांनी आभार मानले. 

‘आता राष्ट्रवादीची भरती सुरू’
‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यात राजकारण करीत होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोतऱ्या भाषेत शुभंकरोती म्हणत होते. यांचे पंतप्रधान सांगतात, ‘पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो.’ त्या शरद पवारांची निंदानालस्ती करणे फडणवीसांना शोभत नाही. सध्या मुंबईत फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे यांचे वर्चस्व आहे. बापट, शिवतारे, कांबळे यांचे कुणी ऐकत नाही. यांचे आमदार-खासदार लाटेत निवडून आले आहेत. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे उसने उमेदवार आहेत. मात्र, आता त्यांना ओहोटी लागली असून, राष्ट्रवादीची भरती सुरू झाली आहे,’’ असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे नव्या नोटा छापायला रिझर्व्ह बॅंकेला ६० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. एवढ्या पैशात तर कर्जमाफी झाली असती. जाहिरातबाजीवर हा एवढा प्रचंड खर्च करतात की, मोदींचा फोटो पाहिल्याशिवाय एकही माणूस पेट्रोल भरत नाही.
 - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Web Title: minister 90000 crore Non behavioral ajit pawar