रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

सोमनाथ भिले 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

डोर्लेवाडी : रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून (ता.10 ऑगस्ट) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनगाव (ता.बारामती) येथील आकांक्षा प्रदीप दरेकर (वय 16) या अल्पवयीन मुलीचा आज (ता.22) रोजी उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी निर्णय घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

डोर्लेवाडी : रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून (ता.10 ऑगस्ट) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनगाव (ता.बारामती) येथील आकांक्षा प्रदीप दरेकर (वय 16) या अल्पवयीन मुलीचा आज (ता.22) रोजी उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी निर्णय घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

याबाबत मयत मुलीचा चुलत भाऊ सुरज शहाजी दरेकर यांनी बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या माहितीनुसार एक महिन्यापूर्वी फिर्यादीची चुलत बहिण मयत आकांक्षा दरेकर हिने घरामध्ये सर्वांना सांगितले की, झारगडवाडी (ता.बारामती) येथील महेश मासाळ हा शाळेत जाता येता नेहमी माझ्या पाठीमागे येत असतो. व एस.टी.बस मध्ये देखील छेडछाड करीत होता. त्यानंतर फिर्यादीने व नातेवाईकांनी आरोपी महेश मासाळ याच्या घरी जाऊन आई वडिलांना समजावून सांगितले होते. त्यानंतरही आरोपी आकांक्षा हिस त्रास देत होता. छेडछाड करीत होता.

(ता.10) रोजी आकांक्षा कॉलेज वरून घरी आल्यानंतर ती नाराज दिसत होती. तिने महेश मासाळ हा मला शाळेत गेल्यानंतर सारखा त्रास देत आहे. आजदेखील माझ्या मागे येऊन माझी छेडछाड केली त्यामुळे मला जीवन संपवावे वाटतेय असे सांगितले. त्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये जाऊन झोपली होती. (ता.11) रोजी सकाळी घरातील लोक झोपेतून उठले त्यावेळी आकांशा हिने सांगितले की, महेश मासाळ हा सारखा त्रास देत असतो म्हणून मी घरात जनावरांसाठी आणलेले गोचिडाचे औषध पिले आहे. त्यामुळे मला चक्कर येत आहे. त्यानंतर तिचे वडील व फिर्यादीने आकांक्षा हिला बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच आज (ता.22) रोजी आकांक्षा हिचा सकाळी 7 वाजता मृत्यू झाला. मृत्यूची माहिती कळाल्यानंतर आकांशा दरेकर हिच्या नातेवाईकांनी रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच बारामती पोलिस स्टेशन येथे जाऊन जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भुमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. मयत आकांक्षा हिचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विठ्ठल डबडे यांनी नातेवाईकांशी बराच वेळ चर्चा केली. मात्र त्यानंतरही मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने पोलिस प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेश मासाळ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस हवालदार भोसले अधिक तपास करीत आहेत.

छेडछाडीचे प्रकार दुर्देवी... खासदार सुप्रिया सुळे
ग्रामीण भागामध्ये मुलींच्या बाबतीत घडणारे छेडछाडीचे प्रकार दुर्देवी असून असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तसेच पालकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुक्यामध्ये गावभेट दौरा होता. या दौऱ्यामध्ये दगडवाडी (ता.इंदापूर) येथे गावभेट दौऱ्यादरम्यान नागरिकांशी सवांद साधला. छेडछाडीमुळे एखाद्या मुलीला जीव गमवावा लागतो हे दुर्देवी आहे. पालकांसह प्रशासनाने सर्तक राहण्याची आवश्‍यकता असल्याचे सुळे यांनी सांगितले. 

Web Title: minor girl commits Suicide because of rod romeo torture