अर्जांची पडताळणीच होईना! 

अर्जांची पडताळणीच होईना! 

पुणे - राज्य बोर्डाव्यतिरिक्त सीबीएसईसह अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे अर्ज तपासून ते पडताळणी (ऍप्रूव्ह) करून घेण्यासाठी विविध शाळांमध्ये नऊ मार्गदर्शन केंद्रे सोमवारपासून (ता.4) सुरू झाली. परंतु, शाळांनी या केंद्रांच्या वेळा परस्पर बदलल्या असून, सर्व्हर डाउन असल्याचे कारण सांगून टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. 

सीबीएसई, आयसीएई, एनआयओएस, आयबी या बोर्डांच्या विद्यार्थ्यांचे गुण हे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची, तसेच त्यांच्या आरक्षणविषयक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी जाऊन कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांनी भरलेला प्रवेश अर्जाचा भाग एका ऑनलाइन पद्धतीने पडताळणी केला जाणार आहे. पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थ्याला अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही. 

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने माहिती पुस्तिकेत या मार्गदर्शन केंद्रांची वेळ सकाळी दहा ते पाच दिली आहे. काही ठिकाणी या वेळा शाळांना सुट्या असल्याचे कारण देत सोयीनुसार बदलण्यात आल्या आहेत. मुलाचा अर्ज पडताळणी करून घेण्यासाठी जयवंत पाटील हे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड शाळेत गेले होते. त्या वेळी तिथे दुपारी बारा ते चारची वेळ असल्याचा फलक होता. शाळेत चौकशी केली असता सर्व्हर डाउन असल्याची सबबही त्यांना सांगण्यात आली. 

मोबाइलवरही संपर्क नाही 
मार्गदर्शन केंद्रावरील जबाबदार व्यक्तींचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना योग्य माहिती मिळावी, असा त्यामागील उद्देश आहे. मात्र, हे अधिकारी अथवा कर्मचारी त्याला प्रतिसाद देत नसल्याची तसेच, मोबाईल बंद असल्याची पालकांची तक्रार आहे. "सकाळ'च्या प्रतिनिधीने खात्री करून घेण्यासाठी त्या क्रमांकांवर संपर्क साधला असता, कुणीही प्रतिसाद दिला नाही. 

माहिती पुस्तिकेतील वेळ पाहून पालक आणि विद्यार्थी अर्ज पडताळणी करून घेण्यासाठी सकाळी दहानंतर आले होते. परंतु, तेथील वेळ बदलल्याचा फलक पाहून त्यांना परतावे लागेल. अनेक पालक नोकरी करतात. त्यातून वेळ काढून ते निश्‍चित केलेल्या वेळेत केंद्रावर जातात मात्र, अचानक वेळ बदलली जाते. यामुळे वेळ वाया जातो आणि मनस्तापही होतो. 
- जयवंत पाटील, पालक 

माहिती पुस्तिकेत अर्ज मान्यतेसाठी दहा ते पाच वेळ दिलेली आहे. शाळांना सुट्या असल्याने वेळ बदलली असेल. निश्‍चित केलेल्या वेळेनुसारच ही केंद्र सुरू करण्याची आणि सायंकाळी बंद करण्याबाबत शाळांना सूचना दिली आहे. पालकांना यापुढे त्रास सहन करावा लागणार नाही. 
- मीनाक्षी राऊत, सहायक शिक्षण संचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com