आता मिशन महापालिका!

Mahavikasaghadi
Mahavikasaghadi

पुणे - एकत्र लढलो तर भाजपच्या परंपरागत मतदारांचा पायाही उद्‌ध्वस्त केला जाऊ शकतो, हा आत्मविश्‍वास विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाने महाविकास आघाडीला मिळाला. त्यातूनच आता मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्येही आघाडीचा पॅटर्न राबविला जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘किती दिवस टिकणार?’ या प्रश्‍नाला उत्तर देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर आज आघाडीने पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जागा एकत्रित जिंकून भाजपला जोरदार धक्का दिला. या तीनही ठिकाणी वर्षानुवर्षे भाजपचा वरचष्मा होता. सुरक्षित मतदार म्हणजे ‘भाजप’ असेच चित्र होते. ते विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुसून काढण्यात महाविकास आघाडीला यश आले; पण यापुढच्या निवडणुकाही अशाच पद्धतीने लढविल्या तर आपल्याला यश मिळू शकते आणि सत्तेची फळे चाखायला मिळतात, हेही आघाडीतील सर्व पक्षांना समजले आहे. त्यामुळे २०२१ मधील नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आदी महापालिकांची निवडणूक असू किंवा २०२२ मधील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक असो, या एकत्रित लढण्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढून भाजपने जोरदार विजय मिळविला होता. या दोन्ही महापालिकांत काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे स्थान नगण्य राहिले. येत्या निवडणुकीत एकट्याच्या बळावर या दोन्ही महापालिकांत सत्ता मिळवणे आघाडीतील कोणत्याच पक्षाला शक्‍य नाही. पुण्यात भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. पिंपरीतही स्पष्ट बहुमत आहे. अशा वेळी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवावी, असे पर्याय स्थानिक नेत्यांनी मांडले आहेत.

मुंबई महापालिका ही शिवसेनेची खरी ताकद आहे. ही ताकद उद्‌ध्वस्त करण्यासाठी गेल्या निवडणुकीपासूनच भाजपने आपली शक्ती पणाला लावली होती. मुंबई ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न थोड्या जागांकरिता भंगले.

शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुंबई हवीच असल्याने त्यांनी मुंबईतही महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जर असे झाले तर भाजपला महापालिका राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

प्रभागपद्धतीतील बदल पथ्यावर 
महापालिका निवडणुकीत भाजपने केलेली बहुप्रभागपद्धती रद्द करून दोनसदस्यीय प्रभाग करण्यावर राज्य सरकारचे जवळजवळ एकमत झाले आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. दोनचा प्रभाग झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला त्याचा फायदा होईल. पुण्यात नवीन २३ गावे समाविष्ट केली, तर राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. त्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली गेली, तर भाजपला निवडणूक जिंकणे कठीण होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com