मतदानयंत्रांचा गैरवापर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) गैरवापर करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षवगळता अन्य पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी संयुक्त बैठकीत रविवारी केली. त्याबाबत पुराव्यांसह न्यायालयामध्ये 200 याचिका दाखल करणार असल्याचे सर्वपक्षीय उमेदवारांनी सांगितले. 

पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) गैरवापर करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षवगळता अन्य पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी संयुक्त बैठकीत रविवारी केली. त्याबाबत पुराव्यांसह न्यायालयामध्ये 200 याचिका दाखल करणार असल्याचे सर्वपक्षीय उमेदवारांनी सांगितले. 

गोखलेनगरमध्ये एका संस्थेच्या सभागृहात या वेळी भाजपवगळता इतर पक्षांचे पराभूत उमेदवार उपस्थित होते. बापू पठारे, दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, नीलेश निकम, ऍड. रूपाली ठोंबरे-पाटील, अस्मिता शिंदे, सचिन भगत, धनंजय जाधव, नारायण चव्हाण, विजय मारटकर, विनायक हनमघर, गणेश भोकरे आदींसह माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार उपस्थित होते. ईव्हीएम मशिनमध्ये झालेल्या गैरप्रकाराचे पुरावे गोळा करून पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचे या वेळी ठरले. तसेच, मंगळवारी (ता. 28) बालगंधर्व रंगमंदिर ते वैकुंठ स्मशानभूमी दरम्यान ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढण्याचे निश्‍चित झाले. 

सुमारे दोन तास झालेल्या बैठकीत बहिरट म्हणाले, ""प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी जाहीर केलेले मतदान या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे संशय गडद होत आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, पुराव्यांसह न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.'' 

ऍड. पाटील म्हणाल्या, ""गटनिहाय झालेल्या मतदानाची आमची आकडेवारी आणि निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेली आकडेवारी यात प्रचंड तफावत आहे. याच मुद्‌द्‌यांवर न्यायालयात बाजू मांडणे अवघड होणार नाही. प्रत्येक नागरिकांना त्यांनी कोणाला मतदान केले, याची माहिती मिळाली पाहिजे. मतदानयंत्रांमध्ये गैरप्रकार केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या विरोधात सर्वपक्षीय जनआंदोलन उभारले पाहिजे.'' भगत म्हणाले, ""भाजपवगळता अन्य उमेदवारांना 4 ते 5 हजारांनी मते कशी काय कमी पडली. अनेक नागरिक आम्ही कोणाला मतदान केले याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तयार आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आणि आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी होईल.'' 

अस्मिता शिंदे म्हणाल्या, ""प्रभाग 36 मध्ये प्रत्यक्ष मतदान 32 हजार 750 झाले. मात्र, मशिनमध्ये 38 हजार मतदान झाल्याचे दाखविण्यात आले. यातून ईव्हीएममधील गैरप्रकार स्पष्ट होतो.'' 

कुंभार म्हणाले,""सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये मतदाराने कोणाला मतदान केले याची माहिती असावी म्हणून त्याची प्रिंट देण्यात यावी, असा निकाल दिला आहे; परंतु निवडणूक आयोगाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे या संदर्भात न्यायालयात दाद मागितली पाहिजे.'' 

संगणक अभियंत्यांचे प्रात्यक्षिक 
ईव्हीएम उत्पादक कंपन्यांतील दोन अभियंत्यांनी या बैठकीत ईव्हीएममध्ये फेरफार कसा होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच, मतदान यंत्रांमध्ये चुंबकीय लहरींचा वापर करून फेरफार शक्‍य असून, त्याचा तपास होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Misuse of voting machine