अंतर्वस्त्राबाबतची नियमावली मागे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - शाळेत येताना विद्यार्थिनींनी विशिष्ट रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत, स्कर्टची लांबी ठराविक असावी इत्यादी जाचक अटींची नियमावली एमआयटीच्या विश्‍वशांती गुरुकुल अंतर्गत येणाऱ्या शाळा प्रशासनाने अखेर मागे घेतली. नियमावलीविरोधात पालक आणि विविध संघटनांकडून उमटलेल्या संतप्त भावनापुढे शाळा प्रशासन नमले आहे.

पुणे - शाळेत येताना विद्यार्थिनींनी विशिष्ट रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत, स्कर्टची लांबी ठराविक असावी इत्यादी जाचक अटींची नियमावली एमआयटीच्या विश्‍वशांती गुरुकुल अंतर्गत येणाऱ्या शाळा प्रशासनाने अखेर मागे घेतली. नियमावलीविरोधात पालक आणि विविध संघटनांकडून उमटलेल्या संतप्त भावनापुढे शाळा प्रशासन नमले आहे.

‘एमआयटी’च्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद शाळा आणि एमआयटी प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी जाचक अटींची नियमावली जाहीर केली होती. पालकांसह विविध संघटनांकडून या नियमावलीच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून या शाळांसमोर निदर्शने करण्यात येत होती. याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक विभागामार्फत समिती पथक गुरुवारी दुपारी शाळेत दाखल झाले. यात शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, महापालिका उपायुक्त शिवाजी दौंडकर आदींचा समावेश होता. या समितीने शाळा प्रशासनाशी चर्चा केली आणि वादग्रस्त नियमावलीला स्थगिती देण्याचे आदेश शाळा प्रशासनाला दिले.

दरम्यान, दिवसभर पालकांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते शाळेच्या परिसरात ठाण मांडून बसले होते. ही नियमावली लागू करणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच पास्को कायद्यांतर्गत शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी केली आहे.

शाळा प्रशासनाला घेराव
शिस्तीच्या नावाखाली शाळांनी विद्यार्थ्यांवर जाचक अटी लादल्याचा निषेध करण्यासाठी भीम आर्मीतर्फे शाळा प्रशासनाला घेराव घालण्यात आला. या वेळी महिला अध्यक्षा नीता अडसुळे, सीताराम गंगावणे, मीना गवळी आदी उपस्थित होते.

शाळा प्रशासनाने डायरीमध्ये दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिल्या होत्या. गणवेशासंदर्भात दिलेल्या सूचनांमधून कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. विद्यार्थी केंद्रित विचार करून केलेल्या सूचना मागे घेण्यात येत आहेत.
- डॉ. सुचित्रा कराड, कार्यकारी संचालिका आणि विश्‍वस्त, एमआयटी

शाळेने घातलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे अवघड झाले होते. पाणी पिणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, यासाठीही शाळेने विशिष्ट वेळा दिल्या होत्या. तसेच केवळ ‘सीबीएसई’मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांनाच मैदानात खेळायला पाठविले जात असून,  राज्य शिक्षण मंडळात प्रवेश घेतलेल्या मुलांना मैदानाचा वापर करू दिला जात नाही.
- सारिका बोरावडे, पालक

Web Title: MIT School Administration finally withdrew the rules and regulations