आंबेगावला 'मान' मिळूनही शिरूरला टोचले नाही 'शिंग' ...

नितीन बारवकर
सोमवार, 29 जून 2020

 नेतृत्वाच्या अनोख्या कौशल्याचा आविष्कार आमदार अशोक पवार यांनी घडविला. त्यामुळे सभापतिपदाचा 'प्रकाश' पुन्हा पाडण्यासाठी सरसावलेल्यांची तोंडे कडू पडली...

शिरूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावर आंबेगाव मतदारसंघाचा झेंडा फडकला असला; तरी शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा होत आहे. या निवडीत ज्येष्ठत्वाचा मान कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मिळाला असला; तरी पवारांच्या भात्यातून सुटलेल्या जहरी बाणांमुळे 'त्या' विभागातले भलेभले गारद होऊन 'विभागीय अस्मिता' चांगलीच घायाळ झाल्याचे चित्र आहे. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडीवरून यापूर्वी झालेल्या मंगलमय घडामोडींमुळे या वेळी आमदार पवार यांनी सुरवातीपासूनच अतिशय सावध पवित्रा घेतला होता. आबाराजे मांढरे या आपल्या कट्टर समर्थक संचालकाला सभापतिपदावर बसवण्याचे पक्के नियोजन त्यांनी केले होते. मात्र, आंबेगाव भागातील काही महत्वाकांक्षी संचालकांनी बंडाळी माजवत गुप्त हालचाली सुरू केल्या. विरोधी भाजपच्या तीन संचालकांशीही संधान साधले. या हालचालींचा सुगावा लागताच आमदार पवार यांनी सर्वांची मते जाणून घेण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समोर प्रत्येकाला उघडे केले. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

गतवेळी शिरुर भागात सभापतिपद होते, यावेळी आमच्या भागाला मिळावे, अशी आग्रही मागणी आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या 39 गावातील संचालकांनी केली. याला आमदार पवार विरोध करतील, आपल्या भागात पद नेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील, असा या मंडळींचा होरा होता. तीच संधी साधून सर्व असंतुष्टांना, यापूर्वी शब्द देऊनही संधी न दिलेल्या नाराजांना आणि विरोधकांना हाताशी धरुन हवी तशी खिचडी शिजवण्याचा घाट घालण्यात आला होता. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

'आमच्या भागावर कायमच अन्याय होत आलाय' या पालुपदामुळे याला वरिष्ठ पातळीवरूनही हवी तशी ताकद आणि फूस मिळण्याची शक्यता होती. नेमके हेच डावपेच हेरुन आमदार पवार यांनी सर्वांची मते जाणून घेताना    'आमच्या पाचपैकी कुणालाही सभापती करा' असे त्यांच्याच तोंडून वदवून घेतले आणि 'हारे तो भी बाजी मारे' या युक्तीप्रमाणे बंडाळीचा डाव लिलया उलटवला.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार पवार यांच्या या खेळीने गारद झालेल्या संचालकांना आज अखेरच्या क्षणी काहीच हालचाली करता आल्या नाहीत. शिरुर भागाला सभापती द्यायचे नाही, या ठाम पावित्र्यामुळे शिरूरच्या संचालकांची खप्पामर्जी ओढवून घेताना 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' या उक्तीप्रमाणे तोंड दाबून बुक्क्यांचा मारही सहन करावा लागला. 

सभापतिपदाबाबत आपली मते मांडताना आणि आमच्यापैकी कुणालाही सभापती करा, असे छातीठोकपणे सांगणा-या या  महत्वाकांक्षी संचालकांवर 'हात दाखवून अवलक्षण' अशी वेळ आली. आमदार पवार यांच्या मुत्सद्देगिरीने आणि वेळप्रसंगी आपल्या माणसांना नाराज करून खेळल्या गेलेल्या या अनोख्या खेळीने 'मान' मिळवण्यासाठी 'शिंग' रोखलेल्या आणि सभापतिपदाचा 'प्रकाश' पुन्हा पाडण्यासाठी सरसावलेल्यांची तोंडे कडू पडली आणि नेतृत्वाच्या अनोख्या कौशल्याचा आविष्कार घडवीत आजच्या सोमवार म्हणजे शंकराच्या वाराच्या दिवशी सभापतिपदाचे गोड जांभूळ त्यांनी शंकर जांभळकर यांच्या मुखी भरवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashok Pawar's game was decisive in the election of the chairman of Shirur Bazar Samiti