प्रदिपदादा, उमेदवारी मिळाली तर तुमचा गाडा फळीफोड ठरेल: पाचर्णे

शरद पाबळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जिंकण्याच्या आत्मविश्वासानेच मैदानात उतरतो - प्रदिप कंद

जिंकण्याच्या आत्मविश्वासानेच मैदानात उतरतो - प्रदिप कंद

कोरेगाव भीमा (पुणे) : शिरुर-हवेली मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णेंसह कोण कोण उमेदवार असतील? तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार अशोक पवार यांना मिळणार की जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना मिळणार ? याबाबत सध्या चर्चां रंगत आहेत. या पार्श्वभुमीवर वाघोली येथे पुणे जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. संदिप भोंडवे यांनी आयोजित केलेल्या पीटीपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे व जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी खिलाडूवृत्तीने केलेल्या फटकेबाजीला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली.

पीटीपीएल क्रिकेट स्पर्धेत आमदार बाबुराव पाचर्णे व जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे एकाच सोफ्यावर बसून सामन्यांचा आनंद घेत होते. यावेळी अंतिम टप्प्यात प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघ विजेता ठरला. यावेळी निकालापुर्वी बोलताना पाचर्णे म्हणाले, ‘सामना अंतिम टप्प्यात आलाय, प्रदिपदादांचा संघ विजयाकडे घोडदौड करतोय. प्रदिपदादा, तुमचा संघ अनेक ठिकाणी विजेता ठरलाय. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत जसा फळीफोड गाडा असतो, तसेच क्रिकेटमध्येही तुमचा गाडा फळीफोड ठरलाय, आगामी निवडणुकीच्या मैदानात पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तेथेही तुमचा गाडा फळीफोड ठरेल. त्यासाठी शुभेच्छाही देतो, मात्र पक्षाकडून तुम्हाला संधी मात्र मिळणे आवश्यक आहे. असे सांगायला मात्र आमदार पाचर्णे विसरले नाहीत.    

दरम्यान, 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या लढतीतही अशीच मैत्रीपुर्ण लढत होईल का ? या निवेदकाने विचारलेल्या प्रश्नावरही आमदार पाचर्णे यांनी तितक्याच मुत्सदीपणाने उत्तर दिले. ते म्हणाले, ‘कोणताही खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहीजे. त्यातच वेगळा आनंद असतो. निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढायचे असते व जिंकायचेही असते. अशावेळी प्रतिस्पर्ध्याला कमी समजायचे नाही. त्यासाठीच अखेरपर्यंत लढायचे आहे.’

तर हाच प्रश्न निवेदकाने प्रदिप कंद यांना विचारला असता त्यांनीही खिलाडूपणे उत्तर देताना आपण 2019च्या रिंगणातला खेळाडू असल्याचे आवर्जुंन सांगितले. ते पुढे म्हणाले, पुर्वीपासून खेळाडू असल्याने हारजीतची भिती मनात कधीच नसते. मात्र, मैदानात उतरतानाच जिंकण्याच्याच आत्मविश्वासातून उतरतो. अन्यथा मैदानात उतरतच नाही. असे आत्मविश्वासानेच उत्तर दिले.

यावर आपल्या समोर आमदार पाचर्णेंसारखे अनुभवी स्पर्धक आहेत, अशावेळी काय चित्र असेल ? या प्रश्नावर बोलताना प्रदिप कंद म्हणाले, ‘आमदार बाबुराव पाचर्णे यांना पाच निवडणुकांचा अनुभव असल्याने त्यांच्या विषयी आदरच आहे. मात्र, विकासाच्या प्रक्रियेत नवीन चेहरे समोर आल्यानंतर जनतेमध्ये नवीन उत्साह दिसतो. आम्हा दोघांचे पक्ष वेगळे असले तरी दोघांची भुमिका मात्र जनतेच्या विकासाचीच असल्याने निवडणुकीत (कोणाला पाठबळ द्यायचे याबाबत) जनतेच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होईल. असे खिलाडूपणे उत्तर देत पाचर्णे यांचा आदरही राखला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

Web Title: mla baburao pacharne n pradip kand politics