पुण्यात ट्रॅफिक सोडविण्यासाठी आमदार उतरले रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

चाकण आमदार सुरेश गोरे यांनी दुपारी एकच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भेट दिली आणि पोलिस अधिकारी, वाहतूक कर्मचारी यांना समज देऊन वाहतूककोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. 

पुणे : चाकण आमदार सुरेश गोरे यांनी दुपारी एकच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भेट दिली आणि पोलिस अधिकारी, वाहतूक कर्मचारी यांना समज देऊन वाहतूककोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना 'समज' देऊन तेथून हाकलून दिले.
 
चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत 'सकाळ'ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. चाकणच्या मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या कोंडीत कामगार, प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, रुग्ण सारेच अडकतात. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी आमदार गोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे, किरण मांजरे, लक्ष्मण जाधव, विलास गोसावी आदी रस्त्यावर आले. तळेगाव चौकात पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची पाहणी केली. 

या वेळी आमदार गोरे यांनी सांगितले की, "मार्गावरील अवैध वाहतूक बंद झाली पाहिजे. ही मागणी करूनही पोलिस वाहतूक बंद करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. कंपन्यामुळे अवजड वाहनांची कंटेनर, ट्रेलर वाहतूक मोठी आहे. ही वाहतूक काही वेळ बंद ठेवली पाहिजे. पोलिस आयुक्तालयात वाहतूक विभागासाठी एवढे पोलिस अधिकारी, कर्मचारी असताना ते काय करतात, असा प्रश्‍न आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA came to road to relieve traffic in Pune