आमदार लांडगेंच्‍या खासदारकीचा पाया भक्‍कम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमधून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एका दगडात दोन पक्षी’ मारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळा’ची ‘टिकटिक’ बंद पाडली आहे. परंतु, त्याबरोबरच भोसरीमधून शिवसेनेच्या ‘धनुष्या’ची दोरी देखील उखडून टाकण्यात पूर्णपणे यश मिळविले आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघामधून खासदारकीची निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना स्वतःच्या पैलवानकीची चुणूक दाखविली असल्याचे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बालेकिल्ला’ असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधून गेल्या ३ ‘टर्म’ पासून शिवसेनेचे खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव-पाटील कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधून राष्ट्रवादीला उखडून टाकण्यासाठी भोसरीचा आखाडादेखील स्वतःच्या ताब्यात आवश्‍यक होता. त्यामुळे राजकीय भान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी महेश लांडगे यांचा पक्षप्रवेश केला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या विरोधातील स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी लांडगे यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत महापालिका निवडणुकीत ४४ पैकी ३२ जागांवर नगरसेवक निवडून आले.      

विशेष म्हणजे लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा ‘गजर’ होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली. परंतु, विधानसभा आणि त्या पुढचा विचार करत शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरीच्या आखाड्यातील स्वतःचा पाया भरभक्कम करण्यात यश मिळविले. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री बापट लांडगे यांना प्रोत्साहित करत आहेत. हे पाहून त्यांच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी आढळराव-पाटील यांनीही लांडगे यांची भोसरीत नाकाबंदी करण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

गतवेळेस भोसरी विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे या निवडणुकीसाठी उभ्या होत्या. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेची आव्हाने रोखण्यासाठी महेश लांडगे यांनी आढळराव-पाटील यांना भोसरीच्या ‘एक गाव भोसरी.. दहा गावं दुसरी’ची झलक दाखविली. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’मधून बाणच बाहेर पडणार नाहीत याकडे त्यांनी लक्ष दिले. आढळराव-पाटील यांची नाकाबंदी मोडून काढल्याचे बोलले जात आहे.  

शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, विद्यमान नगरसेवक धनंजय आल्हाट हे पालिका निवडणुकीत पराभूत झाले. तर सीमा सावळे, संगीता पवार, अजय सायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व घडामोडीदेखील लांडगे यांच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे.

Web Title: MLA mahesh landage strong foundation for MP