Nilesh Lanke : आमदार लंके यांचे बेमुदत उपोषण मागे

सोमवारी दिवसभर उपोषण; अधिकाऱ्यांचे लेखी आश्‍वासन
MLA nilesh Lanke indefinite hunger strike is over Written assurance from authorities pune
MLA nilesh Lanke indefinite hunger strike is over Written assurance from authorities puneSakal

पुणे/विश्रांतवाडी : नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या कामांच्या मागणीसाठी सोमवारी (ता.२७) सकाळपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण जलसंधारण आयुक्तांच्या लेखी आश्‍वासनानंतर सोमवारी सायंकाळी मागे घेतले.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ३० बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतरही या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आमदार लंके यांचा आरोप होता. ही कामे तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील येरवडा येथील मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयासमोर हे उपोषण सुरु केले होते.

या सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन या विभागाचे अतिरिक्त सुनील कुशेरे यांनी आमदार लंके यांना दिले. याबाबतचे पत्र दिल्यानंतर लंके यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. या आश्‍वासनानुसार येत्या मंगळवारी (ता.२८) या कामांच्या निविदा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारनेर तालुक्यातील २१ आणि नगर तालुक्यातील ९ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांसाठी मिळून एकूण २९ कोटी १९ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती.

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ८ जुलै २०२२ रोजी या कामांना स्थगिती दिली. मात्र ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर ता. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ही स्थगिती उठविण्यात आली होती.

परंतु स्थगिती उठविल्यानंतरही प्रत्यक्ष ही कामे सुरु होत नसल्याची लंके यांची मुख्य तक्रार होती. अन्य तालुक्यांतील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ती कामेही पूर्ण झाली. मात्र पारनेर तालुक्यातील कामांची निविदा प्रक्रिया मात्र रोखण्यात आली होती, असा आरोप लंके यांनी यावेळी केला.

आज सकाळी ११ वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह लंके यांनी मृद व जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी साडेपाच वाजता लिंबू पाणी घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी मोबाइलद्वारे चर्चा केली.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर, चंद्रकांत चेडे, कारभारी पोटघन, अभयसिंह नांगरे,जितेश सरडे, सतीश भालेकर, सुदाम पवार, किसनराव रासकर, ठकाराम लंके, वसंत कवाद,बबलू रोहोकले, बाळासाहेब लंके, डॉ. बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com