आमदार संग्राम थोपटे म्हणतात, आपल्या कामांना ताई, दादा, काकांचे नाव 

किरण भदे
सोमवार, 29 जुलै 2019

आपण कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांना ताई, दादा, काकांचे नाव जोडले जात आहे श्रेयवादात जनतेला भुलवले जात आहे, परंतु कॉंग्रेस कार्यकर्ते सक्षम आहेत, ते आपण केलेले काम घराघरांत पोचवतील, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. 

नसरापूर (पुणे) : ""आपण कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांना ताई, दादा, काकांचे नाव जोडले जात आहे श्रेयवादात जनतेला भुलवले जात आहे, परंतु कॉंग्रेस कार्यकर्ते सक्षम आहेत, ते आपण केलेले काम घराघरांत पोचवतील,'' असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. 

इंगवली (ता. भोर) येथे कॉंग्रेस पक्षाच्या नसरापूर- भोलावडे गटातील बूथ कमिटी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी थोपटे बोलत होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनावणे, मतदारसंघाचे समन्वयक दिलीप बाठे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मदन खुटवड, एकनाथ वीर, बाजार समितीचे सभापती अंकुश खंडाळे, उपसभापती संपत आंबवले, खरेदी विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर, उपसभापती माउली दानवले, राजगड कारखान्याचे संचालक सोमनाथ वचकल, संतोष सोंडकर, विठ्ठल वरखडे, वसंत वरखडे, मुरलीधर दळवी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात युवक कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन दामगुडे व कार्याध्यक्ष महेश टापरे यांचा सत्कार आमदार थोपटे व चंद्रकांत भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला 

थोपटे म्हणाले, ""भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्‍यात विकासकामे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. काही मंजूर करून आणली आहेत. भाटघर प्रकल्पग्रस्तांसाठी 18 कोटीचा निधी आणला आहे. परंतु, विरोधक जाणीवपूर्वक सोशल मिडीयाद्वारे प्रचार करून या कामांवर हक्क सांगत आहेत.'' 

प्रास्तविकात विठ्ठल आवाळे यांनी विसगाव खोऱ्याच्या खालोखाल जास्तीत जास्त मताधिक्‍य नसरापूर- भोलावडे गटातून देण्याची ग्वाही दिली. या वेळी माजगावचे माजी सरपंच श्रीरंग मोरे, विलास पडवळ, अशोक पडवळ या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. जगन्नाथ मालुसरे यांनी सूत्रसंचालन केले. मदन खुटवड यांनी आभार मानले. 

कामे मंजूर करून आणण्यासाठी जेवढे श्रम होत नाहीत, त्यापेक्षा जास्त ती कामे आपण करून आणली आहेत, हे सांगण्यासाठी होत आहेत, हे योग्य नाही. केलेल्या विकासकामांमुळे जनता आमच्या कायम पाठीशी राहील.

 - संग्राम थोपटे, आमदार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Thopte accuses opposition