Vidhan Sabha 2019 : हडपसरच्या वाहतूक कोंडीला पूर्वीचे सत्ताधारी जबाबदार : टिळेकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

पूर्वीच्या सत्ताधार्‍यांकडून या भागात दोन मोठ्या टाउनशिप उभारल्या गेल्या. मात्र, तेथील वाहतुकीचा प्रश्न कधीच लक्षात घेतला नाही.

मांजरी : हडपसरची वाहतूक समस्या ही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भळभळती जखम आहे. पर्यायी रस्त्यांच्या माध्यमातून ही जखम भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षात आपण केले आहे. मतदारसंघातील पूल, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, अंडरपास व महामार्ग बांधणी ही त्याची उदाहरणे असून या कामांच्या पूर्ततेसाठी मतदार याहीवेळी माझ्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी प्रचार करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांचे विशेषतः वाहतूक प्रश्न मार्गी लावण्या बाबतच्या कामांची माहिती ते नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत. तसेच सुरु असलेल्या कामाबाबतची माहिती ते मतदारांना सांगत आहेत. त्यावेळी मागील सत्ताधाऱ्यांनी जटिल केलेला हा प्रश्न आपल्याकडून कसा सोडवला जात आहे, हेही ते आवर्जून सांगत आहेत.

टिळेकर म्हणाले, "पूर्वीच्या सत्ताधार्‍यांकडून या भागात दोन मोठ्या टाउनशिप उभारल्या गेल्या. मात्र, तेथील वाहतुकीचा प्रश्न कधीच लक्षात घेतला नाही. त्यामुळे मगरपट्टा-खराडी बायपासवर कायम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उड्डाणपुलाचे व पर्यायी मार्गांचे प्रश्न त्यांना सोडवता आलेले नव्हते.

राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघातील घोरपडी आणि मांजरी रेल्वे उड्डाणपूल, केशवनगर-मांजरी रस्ता, भापकरमळा-मांजरी रस्ता, ग्लायडिंग सेंटर शेजारील ससाणेनगर पर्यायी रस्ता, मुंढवा चौक उड्डाणपूल, ससाणेनगर अंडरपास, लुल्लानगर उड्डाणपूल, कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपूल, कात्रज कोंढवा रस्ता व वडगाव पूल ते लोणीकंद रिंगरोडचे काम मार्गी लावले आहे.''

Image may contain: sky and outdoor

लुल्लानगर : गेली अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या येथील उड्डाणपूलामुळे वाहतूकीचा मोठा प्रश्न सुटला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Yogesh Tilekar comment on opposition party leaders and Traffic issue of Hadapsar