सीएनजीची थकीत रक्कम भरा अन्यथा... : एमएनजीएलचा पीएमपीला इशारा

MNGL warn PMPML to pay the CNG dues.jpg
MNGL warn PMPML to pay the CNG dues.jpg

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएमएल)कडे 'सीएनजी' पुरवठ्यापोटी सुमारे 37 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी न फेडल्यास नाईलाजास्तव 'पीएमपी'चा 'सीएनजी' पुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे, उद्‌भविणाऱ्या परिस्थितीला 'पीएमपी'च जबाबदार राहील'', असा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) दिला आहे. मात्र, ''पीएमपी' आणि 'एमएनजीएल' या दोघांसाठी सीएनजी पुरवठा चालू राहणे हे कधीही चांगले असून आम्ही थकीत मुद्दलाची रक्कम देऊ. परंतु, त्यावरील व्याज देऊ शकत नाही, अशी भूमिका 'पीएमपी' प्रशासनाने घेतली आहे.
 
'पीएमपी'च्या ताफ्यात सध्या सुमारे 2 हजार बसगाड्या असून त्यापैकी 950 गाड्या निव्वळ सीएनजीवर धावतात. या सर्व सीएनजी गाड्यांना एमएनजीएलकडून दररोज 'सीएनजी'चा पुरवठा केला जातो. त्याच्या मोबदल्यात 'पीएमपी'ने अलीकडेच एकूण सुमारे 43 कोटी 30 लाख रुपयांच्या थकबाकीपैकी काही रक्कम अदा केली आहे. मात्र, एमएनजीएलकडून 'पीएमपी'ला सीएनजीचा पुरवठा चालू असल्याने थकबाकीत भर पडत आहे. 

'एमएनजीएल' चे संचालक (व्यवसाय) संतोष सोनटक्के म्हणाले,"आम्ही 'पीएमपी'ला दररोज 30 लाख रुपये किंमतीचा 12 हजार किलो इतका 'सीएनजी'चा पुरवठा करतो. यानुसार प्रत्येक महिन्याला आम्ही "पीएमपी'ला सुमारे 10 कोटी रुपयांच्या 'सीएनजी'ची विक्री करत असतो. 'पीएमपी'कडून दर महिन्याला त्या मोबदल्यात 4 ते 5 कोटी रुपये अदा केले जातात. परंतु, उर्वरीत 4 ते 5 कोटी रुपये शिल्लक ठेवले जातात. मात्र, त्यामुळे, थकबाकी वाढत चालली आहे. 43 कोटी 30 लाख रुपयांच्या थकबाकीपैकी 'पीएमपी'ने अलीकडेच 6 कोटी 22 लाख रुपये अदा केले. परंतु, ''आम्ही दररोज सीएनजी पुरवठा करत असल्याने थकबाकीत फार फरक पडलेला नाही. या संदर्भात आम्ही 'पीएमपी'च्या व्यवस्थापकीय संचालिका, संचालक मंडळ, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदी संबंधित घटकांना वेळोवेळी पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे, आम्हाला 'पीएमपी'चा सीएनजी पुरवठा नाईलाजास्तव थांबवावा लागेल. त्यामुळे, उद्‌भविणाऱ्या परिस्थितीला 'पीएमपी' जबाबदार राहील.'' 

व्याजाची रक्कम देण्याची तयारी नाही - 'पीएमपी' 
'' 'सीएनजी' पुरवठ्याच्या बदल्यात 'एमएनजीएल'ला देय रक्कम देण्यात पुढे मागे होऊ शकते. आम्ही नियमितपणे पैसे भरत आहोत. फार रक्कम थकली आहे किंवा आम्ही दिवाळखोरीत आहोत असे नव्हे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही त्यांना 6 कोटी रुपयांच्या आसपास रक्कम अदा केली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंतचा व्यवहार पूर्ण झाला आहे. माझ्या माहितीनुसार 18 कोटी रुपयांच्या आसपास थकीत रक्कम असून उर्वरीत व्याजाची रक्कम आहे. थकीत अंदाजे 37 कोटी रक्कम ही मुद्दल आणि त्यावरील व्याज अशी एकूण मिळून आहे. आम्हाला व्याजाचे पैसे देणे मान्य नाहीत. किंबहुना ते कमी करावेत अशी आमची मागणी आहे. आम्ही मुद्दलाचे पैसे द्यायला तयार आहोत. आम्ही ते नियमितपणे देण्याचाही प्रयत्न करत आहोत.
एमएनजीएल'कडून आम्हाला थकबाकी भरण्याबाबत नोटीस मिळाली आहे. परंतु, 'सीएनजी' खरेदी-विक्रीचा व्यवहार ही 'पीएमपी' आणि 'एमएनजीएल' या दोघांचीही गरज आहे. त्यामुळे, सीएनजी पुरवठा चालू ठेवणे कधीही चांगले राहील. आम्ही पैसे देण्याची व्यवस्था करत आहोत.''
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 


'पीएमपी' वरील एक दृष्टिक्षेप.. (2016-17 च्या आकडेवारीनुसार) 
- एकूण बससंख्या - 2 हजार 45 
- एकूण बस आगार - 13 
- एकूण बसस्थानके - 2 हजार 392 
- एकूण मार्ग 371 आणि दैनिक फेऱ्या (सरासरी) 17 हजार 74

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com